भाईंदरमध्ये एका महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला करून त्यांना लुटल्याची घटना घडली आहे. डॉ. गायत्री जैस्वाल असं या डॉक्टरचं नाव आहे. रविवारी (२३ जानेवारी) दुपारी चोर पीडित डॉक्टरांच्या दवाखान्यात रुग्ण बनून आला आणि त्याने हा हल्ला केला. या हल्ल्यात डॉ. जैस्वाल गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भाईंदर पोलीस फरार हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
भाईंदर पश्चिम येथील अमृत वाणी परिसरात डॉक्टर गायत्री जैस्वाल (३२) या खासगी दवाखाना चालवतात. रविवारी दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या दवाखान्यात अंगावर चादर लपेटून एक व्यक्ती आला. त्यावेळी दवाखान्यात अन्य रुग्ण नव्हते. तो रुग्ण असल्याचं वाटून डॉ जैस्वाल यांनी त्याला आत घेतले. मात्र अचानक त्याने टेबलावर असलेल्या रक्तदाब तपासणी यंत्राने डॉ जैस्वाल यांच्यावर हल्ला केला. डोक्यावर झालेल्या या हल्ल्याने त्या रक्तबंबाळ होऊन खाली पडल्या.
गळ्यातील सोनसाखळी, मोबाईल आणि रोख रक्कम असलेली पर्स चोरी
या हल्लेखोराने डॉ जैस्वाल यांच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाईल आणि रोख रक्कम असलेली पर्स घेऊन पळ काढला. डॉ जैस्वाल यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर भाईंदर पश्चिम येथील कस्तुरी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितला म्हणून भावाने बहिणीचे कुहाऱ्डीने पाय तोडले
हल्ल्याचा हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. आम्ही हल्लेखोराच्या मागावर असून लवकरच त्याला अटक करू, अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकूटराव पाटील यांनी दिलीय.