कल्याण – कल्याणमध्ये गेल्या चार महिन्याच्या काळात रिक्षा चालकांच्या रिक्षा चोरणारा शिळफाटा रस्त्यावरील कोळेगाव येथील सराईत चोरटा कोळसेवाडी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केला आहे. त्याच्याकडून चोरीच्या चार रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. चोरलेल्या रिक्षा चोरट्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात लपून ठेवल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजेंद्र आजीनाथ जाधव (४२) असे चोरट्याचे नाव आहे. तो पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे अनेक गु्न्हे आहेत. अन्य काही गु्न्हे त्याच्याकडून उघड होण्याची शक्यता पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी व्यक्त केली.

कल्याण पूर्व, पश्चिम हद्दीत मागील चार महिन्यांपासून घरासमोरील मोकळ्या जागेत, रस्त्यावर उभ्या केलेल्या रिक्षा रात्रीच्या वेळेत चोरून नेण्याचे प्रमाण वाढले होते. या चोरीप्रकरणी कोळसेवाडी, बाजारपेठ पोलीस ठाण्यात रिक्षा चालकांनी गुन्हे दाखल होते. कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पथक रिक्षा चोराचा शोध घेत होते. एका गुन्ह्यात एका सराईत चोरट्याची कोळसेवाडी पोलिसांकडून चौकशी सुरू होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कोळेगावचा राजेंद्र जाधव हा रिक्षांची चोरी करत असल्याची माहिती पुढे आली होती. कोळसेवाडी पोलीस त्याच्या मागावर होते.

राजेंद्र जाधव हा कल्याण पूर्वेतील १०० फुटी रस्त्यावर संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना समजल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याला पळण्याची संधी न देता बेसावध ठेऊन झडप घालून अटक करण्यात आली. त्याने कल्याणमध्ये कोळसेवाडी हद्दीत तीन, बाजारपेठ हद्दीत एक रिक्षा चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याने चोरलेल्या रिक्षा पोलिसांनी अहिल्यानगर येथील कर्जत तालुक्यातून ताब्यात घेतल्या. त्याने अन्य काही गुन्हे केले असण्याची शक्यता विचारात घेऊन पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत. त्याच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस निरीक्षक साबाजी नाईक, साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील, संदीप भालेराव, हवालदार सचिन कदम, विशाल वाघ, भगवान सांगळे, गोरक्षनाथ घुगे, विकास भामरे, सुरेंद्र इंगळे यांच्या पथकाने केली.