कल्याण – मेल, एक्सप्रेसमध्ये रात्रीच्या वेळेत प्रवासा दरम्यान आसनावर झोपलेल्या महिलांच्या उशाखालील, पिशवीतील सोन्याचा ऐवज, मोबाईल चोरणाऱ्या चेंबूर येथील एका सराईत चोरटयाला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफिने अटक केली आहे. या चोरट्याकडून चोरीचा सोन्याचा ऐवज खरेदी करणाऱ्या झवेरी बाजारातील दोन सोनारांना पोलिसांनी अटक केली आहे. या चोरट्याकडून नऊ लाख ६८ हजार रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेश अरूण घाग उर्फ विकी (३२, रा. चेंबूर) असे चोरट्याचे नाव आहे. महेशकडून सोन्याचा चोरीचा ऐवज करणारे झवेरी बाजारातील सोनार तानाजी शिवाजी माने (४५), नितीन किसन येळे (४४) यांंना पोलिसांनी अटक केली आहे. माने हे सांगली जिल्ह्यातील विसापूरचे रहिवासी आहेत. येळे हे कुर्ला बैलबाजार येथील रहिवासी आहेत.

मेल, एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना रात्रीच्या वेळेत महिलांच्या जवळील पिशव्या, त्यांच्या उशाखाली ठेवलेल्या सोन्याच्या ऐवजाच्या चोरी झाल्याच्या तक्रारी वाढत्या प्रमाणात कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या. तक्रारीचे स्वरूप एकसारखे आणि चोरीचा प्रकारही ही एकसारखाच पोलिसांना वाटत होता.

कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस साध्या वेशात मेल, एक्सप्रेसमध्ये गस्त घालून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. चेंबूर येथील इसम महेश घाग हा चोरीसाठी कल्याण रेल्वे स्थानक येथे येत आहे अशी गुप्त माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांना मिळाली. गु्न्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कल्याण रेल्वे स्थानकात सापळा लावून कौशल्याने महेश घागला ताब्यात घेतले. त्यांनी आपण मेल, एक्सप्रेसमध्ये चोरी करत असल्याची कबुली पोलीस पथकाला दिली.

कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात २५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड चोरीला गेल्याची, १४ हजार रूपये चोरी गेल्याची तक्रार दाखल होती. वसई रोड पोलीस ठाण्यात चार लाखाची सोन्याची लगड, दोन ॲपल फोन, दोन लाखाची सोन्याची लगड चोरीला गेल्याची तक्रार दाखल होती.

या चोऱ्यांची कबुली महेश घागने दिल्यावर त्याला अटक करण्यात आली. चोरीचा ऐवज तो झवेरी बाजारातील सोनार माने, येळे यांना विकत होता, असे तपासात निष्पन्न झाले. कल्याण गु्न्हे शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, वरिष्ठ निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रोहित सावंत, साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत टेलर, उपनिरीक्षक प्रकाश चौगुले, संदीप गायकवाड, रवींद्र दरेकर, आदी पोलिसांनी ही कारवाई केली.