कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकात एका महिला प्रवाशाला शीतपेयातून गुंगीचे द्रव्य देऊन या महिलेची शुध्द हरपताच एका भुरट्या चोराने त्यांच्या अंगावरील दोन लाख ३३ हजाराचा सोन्याचा ऐवज लुटून पळ काढला. या प्रकरणात तीन इसम सहभागी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या विरुध्द कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली. रविवारी रात्री हा प्रकार कल्याण रेल्वे स्थानकात घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कर्नाटक राज्यातील विजयनगर जिल्ह्यातील उचंगीदुर्ग येथे राहणाऱ्या सुनिता बेळकरी (५०), त्यांची बहिण लक्ष्मी, नातू या कल्याण परिसरात राहत असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे काही कामानिमित्त आल्या होत्या. त्या पुन्हा आपल्या गावी परत जाण्यासाठी रविवारी रात्री कल्याण रेल्वे स्थानकात आल्या. त्या पुद्दुचेरी एक्सप्रेसने प्रवास करणार होत्या. सुनिता यांच्या सोबत त्यांची बहिण लक्ष्मी आणि नातू होता.
रात्री साडे नऊ वाजता पु्द्दुचेरी एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आली. एक्सप्रेसमध्ये चढण्याची लगबग सुरू असताना एका अज्ञात प्रवाशाने घाईघाई करत लक्ष्मी यांना आग्रह करत गुंगीचे द्रव्य असलेले शीतपेय पिण्यास दिले. या अज्ञात प्रवाशाच्या सोबत अन्य दोन ३० ते ३५ वयोगटातील इसम होते. एक्सप्रेसमध्ये त्या सामान्य डब्यात चढल्या. आसनावर बसल्यानंतर लक्म्मी यांना काही वेळाने गुंगी आली. या संधीचा गैरफायदा घेत तिन्ही भुरट्यांनी लक्ष्मी यांच्या गळ्यात, कानात असलेले दोन लाख ३३ हजार रूपयांचे सोन्याचे दागिने काढून घेतले. पुढील रेल्वे स्थानक येताच भुरटे उतरून पळून गेले.
शुध्दीवर आल्यावर लक्ष्मी यांना आपल्या गळ्यातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे दिसले. त्यांनी जवळील पिशव्या शोधल्या त्यात दागिने मिळाले नाहीत. अज्ञात चोरट्याने ते लुटून नेले असल्याचा संशय घेत त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हा गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग झाला.
पोलिसांनी तातडीने रेल्वे स्थानकातील कल्याण रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात त्यांना तीन जण या महिले भोवती फिरत असल्याचे दिसले. या तिन्ही इसमांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. आता सुट्टीचा हंंगाम सुरू होणार आहे. कल्याण रेल्वे स्थानक, दिवा रेल्वे स्थानकात लांब पल्ल्यांचे फलाट असलेल्या भागात हे प्रकार वाढण्याची शक्यता विचारात घेऊन लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा जवानांनी फलाटावरील गस्त वाढविण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांकडून केली जात आहे.