लोकसत्ता प्रतिनिधी

उल्हासनगर : तपासाच बचावासाठी चोरटे चोरीच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरतात. उल्हासनगरात मात्र एका चोरट्याने नग्न होत चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात गायकवाडपाडा परिसरात एका मोबाईल दुकानात झालेली ही चोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. हा नग्न चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

उल्हासनगर कॅम्प पाचमधील गायकवाड पाडा भागात असलेल्या ‘ओम साई राम कम्युनिकेशन’ या मोबाईल दुकानात नुकतीच चोरी झाली. चोरट्याने दुकानाच्या भिंतीत भगदाड पाडत त्यातून दुकानात प्रवेश केला. यावेळी चोरट्याने मोबाईल, ब्लूटूथ उपकरणे तसेच रोख रक्कम लंपास केली. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणाचे सीसीटीव्ही चित्रण समोर आल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली. या चोरट्याने नग्न होत दुकानात प्रवेश केला. त्याच्या अंगावर एकही कपडा नसल्याने दुकानमालक चक्रावले.

या चोरट्याने तोंडावर कपडा टाकला असला तरी हा चोरटा पूर्ण नग्न अवस्थेत असून, अत्यंत सहजतेने चोरी करताना दिसतो आहे. चोरीसाठी नग्न येण्यामागे त्याचे काही विशेष कारण होते की ओळखता येऊ नये म्हणून त्याने असा प्रकार केला याबाबत आता पोलीस तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चोरट्याचा शोध सुरू केला आहे. सीसीटीव्ही चित्रणाच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Story img Loader