ठाणे : ठाणे पोलीस दलातील एका महिला पोलीस कर्मचारीच्या घरात शिरून घरामधील पाच लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. कोर्टनाका येथे पोलीस वसाहत आहे.
या वसाहतीमध्ये संबंधित महिला पोलीस कर्मचारी त्यांचे पती आणि दोन लहान मुलांसह वास्तव्यास होते. परंतु त्यांची सोलापूर प्रशिक्षण केंद्रात दोन महिन्यांसाठी नियुक्ती झाल्याने त्या तेथे मुलांना घेऊन वास्तव्यास आहेत. तर त्यांचे पती एकटेच या घरामध्ये राहत होते. शुक्रवारी त्यांचे पती त्यांना भेटण्यासाठी सोलापूर येथे निघाले होते.
निघताना त्यांना घराला कूलूप लावले. सोमवारी ते तेथून परतले. त्यांनी घराचे दार उघडले असता, घरातील कपाटामधील वस्तू चोरीला गेल्याचे आढळून आले. त्यांनी कपाटाची तिजोरी तपासली असता, तिजोरीमधील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याचे आढळले. यामध्ये सोन्याचे दागिने आणि एक लाख ५७ हजार रुपयांची रोकड असा एकूण पाच लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.