लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची कल्याण रेल्वे स्थानकातील गर्दी वाढली आहे. हातामध्ये पिशव्या, मोबाईल, एक्सप्रेसमध्ये चढण्याची गडबड अशा वातावरणाचा गैरफायदा घेत कल्याण रेल्वे स्थानकात काही भुरटे चोर प्रवाशांच्या हातामधील मोबाईल चोरुन नेत आहेत.
अशाप्रकारे मोबाईल चोरीच्या तक्रारी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात वाढल्याने पोलिसांनी विशेष पथक करुन अशा चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. उल्हासनगर येथे राहणारे एक रहिवासी आपल्या उत्तर प्रदेशातील नातेवाईकाला गोरखपूर एक्सप्रेसमध्ये बसून देण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात मंगळवारी आले होते. गोरखपूर एक्सप्रेसमध्ये नातेवाईकाच्या सामानाच्या पिशव्या ठेवून झाल्यावर तक्रारदार एक्सप्रेसमधून उतरत होते. त्यांच्या हातामध्ये मोबाईल होता.
गडबडीत उतरत असताना अचानक काही कळण्याच्या आत त्यांच्या हातामधील मोबाईल गायब झाला. त्यांनी एक्सप्रेसमध्ये चढून, फलाटावर पाहिले तर मोबाईल नव्हता. भुरट्या चोराने मोबाईल चोरल्याची खात्री पटल्यावर त्यांनी लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यावेळी एक इसम तक्रारदाराच्या हातामधील मोबाईल चोरत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याची ओळख पटवून त्याला कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. दीपक पवार असे त्याचे नाव आहे.