कल्याण – कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरातून १३ बुलेट, मोटार सायकली चोरणाऱ्या एका सराईत १९ वर्षांच्या चोरट्याला कल्याण गुन्हे शाखेच्या तपास पथकाने भिवंडीजवळील राजनोली गावातील एका चाळीतून सोमवारी अटक केली. त्याच्या ताब्यातून १६ लाख रुपये किमतीच्या एकूण १२ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
शुभम भास्कर पवार (रा. मंदाबाई चाळ, राजनोली गाव, भिवंडी (मूळ गाव- येल्नुर, ता. निलंगा, जि. लातूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. कल्याण डोंबिवली परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दुचाकी, रिक्षा चोरीचे प्रमाण वाढले आहे. दररोज दोन ते तीन वाहन चोरीचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांनी विशेष तपास पथक स्थापन केले. वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास गुन्हे शाखेच्या पथकाकडून सुरू असताना या पथकातील अंमलदार गुरुनाथ जरग यांना सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे एक वाहन चोर शिळफाटा रस्त्यावरील कोळेगाव हद्दीत फिरत असल्याची माहिती मिळाली.
हेही वाचा – ठाणे : कोपरी उड्डाणपुलाच्या डांबरीकरणासाठी मध्यरात्री वाहतूक बदल
उपनिरीक्षक मोहन कळमकर, अंमलदार गुरुनाथ जरग यांनी कोळेगाव हद्दीत संशयितरित्या फिरणाऱ्या शुभम पवारला ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू केल्यावर त्याने कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाणे हद्दीतून एक बुलेट चोरली आहे. ती आपण आपल्या लातूर जिल्ह्यातील यल्नुर गावी ठेवली असल्याची माहिती दिली. महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी लातूर येथे जाऊन बुलेट आणली. त्या गुन्ह्यात शुभम पवारला अटक केली. त्याची कसून चौकशी सुरू केल्यावर शुभमने आपण कल्याण, डोंबिवली, भिवंडी परिसरातून एकूण १३ दुचाकी वाहने चोरल्याची कबुली पोलिसांना दिली.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शिरसाठ यांच्या पथकाने पुणे, सोलापूर, निलंगा, लातूर जिल्ह्यात शुभमने चोरून विक्री केलेल्या दुचाकी गेल्या दहा दिवसांच्या कालावधीत जप्त केल्या. फुले पोलीस ठाणे हद्दीतून शुभमने पाच, रामनगर पोलीस ठाणे हद्दीतून दोन, विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीतून दोन, कोनगाव हद्दीतून दोन आणि कोळसेवाडी हद्दीतून त्याने एक दुचाकी चोरली होती. या भागातील दुचाकी चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याने आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त शिवराज पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त राजकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ, उपनिरीक्षक मोहन कळमकर, नवनाथ कवडे, हवालदार गुरुनाथ जरग, बालाजी शिंदे, आदींनी ही कारवाई केली.
फोटो ओळ
दुचाकी चोरला अटक करणारे कल्याण गुन्हे शाखेचे पथक.