डोंबिवली शहर परिसरात सोनसाखळी चोरी, घरफोड्या, दुचाकी चोरणाऱ्या तीन सराईत गु्न्हेगारांना रामनगर पोलिसांनी येथील शेलार नाका झोपडपट्टीतून अटक केली. या चोरट्यांवर विविध प्रकारचे १९ गुन्हे दाखल आहेत. या चोरट्यांच्या अटकेतून डोंबिवलीतील अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी वर्तवली. शेलार नाका झोपडपट्टीत यामधील एका आरोपीने घरफोडीचे प्रकार केले आहेत. चोरीसाठी ते चोरीचे स्कुटर वापरत होते. सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लंपास करणे. बंद घराची टाळी तोडून घरफोड्या करण्याचा धंदा आरोपी करत होते, असे वरिष्ठ निरीक्षक सांडभोर यांनी सांगितले.
राहुल उर्फ बोधी सरदार, गुरुदेवसिंग उर्फ काळी नरेश भगानिया, शिवा तुसाबंड अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. ते डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका झोपडपट्टी परिसरात राहतात.
रामनगर, मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून मोटार सायकल चोरी, घरफोड्या, पादचारी महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून पळून जाण्याचे प्रकार वाढले होते. मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत एक महिलेच्या गळ्यातील दुचाकीवरून आलेल्या तीन जणांनी सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता. सीसीटीव्ही चित्रणामध्ये शेलार नाका भागात राहणाऱ्या गुन्हेगारांनी हा प्रकार केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. मानपाडा पोलीस या तिघांच्या मागावर होते. ठाकुर्ली, चोळेगाव भागात रामनगर पोलीस गस्त गालत असताना एका दुचाकीवर तीन जण बसून वेगाने प्रवास करत होते. पोलिसांनी त्यांना अडवले. दुचाकीची कागदपत्र मागितली. ते दाखवू शकले नाहीत. दुचाकी चोरीची असल्याची कबुली दुचाकी स्वारांनी दिली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन रामनगर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली. रामनगर हद्दीत अनेक महिने सोनसाखळ्या, घरफोड्या करणारे हेच आरोपी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. दुचाकीचा वापर महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावण्यासाठी आरोपी करायचे. शेलार नाका परिसरात घरफोड्या केल्याची कबुली आरोपींनी दिली.
पोलिसांनी या तिघांच्या नावावरून त्यांच्या डोंबिवली परिसरातील पोलीस ठाण्यांच्या अभिलेखातील नोंदी तपासल्या. या तिघांवर सोनसाखळी, दुचाकी चोरी, घरफोडी चोरीचे एकूण १९ गुन्हे दाखल आहेत असे दिसून आले. प्राथमिक चौकशीत या तिघांनी चार गुन्ह्यांची कबुली दिली. उर्वरित गुन्हे त्यांच्याकडून वदवून घेतले जातील. चोरीचा ऐवज हस्तगत केला जाईल, असे निरीक्षक सांडभोर यांनी सांगितले.