लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: येथील अभिनव बँकेच्या वेगवेगळ्या एटीएम केंद्रात जाऊन तेथे अभिनव बँकेची आणि इतर बँकांची एटीएम कार्ड वापरून दोन वेगळ्या घटनांमध्ये १० भामट्यांनी २५ लाख ६५ हजार ६०० रुपये काढून बँकेची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे रामनगर, मानपाडा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर कालावधीत चार अनोळखी भामट्यांनी अभिनव बँकेच्या डोंबिवलीतील नांदिवली शाखेतील एटीएम यंत्र, एमआयडीसीतील एटीएम, निळजे गावातील एटीएम यंत्रातून वेगळ्या बँकांच्या एटीएम कार्डचा वापर करून चार अनोळखी भामट्यांनी बँक प्रशासनाला अंधारात ठेऊन बेकायदेशीरपणे सहा लाख ७४ हजार ६०० रूपये काढले. बँकेच्या अंतर्गत हिशेब तपासणीत हा प्रकार उघडकीला आला. या माध्यमातून बँकेची आर्थिक फसवणूक झाल्याने बँक अधिकारी सुरेश शिंदे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
आणखी वाचा-ठाणे मेट्रो कारशेडच्या खर्चात २०० कोटींची वाढ; सल्लागारावर खापर, कंत्राट वादात सापडण्याची चिन्हे
अभिनव बँकेशी संबंधित दुसऱ्या फसवणूक प्रकरणात सहा भामट्यांनी अभिनव बँकेच्या एटीएम कार्डच्या माध्यमातून १८ लाख ९१ हजार रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात अभिनव बँकेचे साहाय्यक व्यवस्थापक पंकज साळी यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत सहा भामट्यांनी संगनमत करून अभिवन बँकेच्या डोंबिवली पूर्वेतील बालाजी हाईट्स येथील एटीएम केंद्रातील यंत्रात विविध बँकांच्या एटीएम कार्डचा वापर केला.
आणखी वाचा-“विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची वाट बघतोय”, असं का म्हणाले खासदार श्रीकांत शिंदे?
एटीएम कार्डचा वापर करताना यंत्रातून रक्कम बाहेर आली. तेव्हा ती रक्कम वेळेत यंत्रातून बाहेर न काढल्याने मूळ खातेदाराच्या बँक खात्यात जमा झाल्याचे संकेत यंत्राने दिले. परंतु, भामट्यांनी ती रक्कम यंत्रात परत जात असताना एटीएमध्ये छेडछाड करून ती खेचून बाहेर काढली. बँक आणि ग्राहकाला संदेश मात्र रक्कम परत संबंधित ग्राहकाच्या खात्यात जमा झाल्याचा आला. अशाप्रकारे विविध बँक एटीएम कार्डचा लबाडीने वापर करून भामट्यांनी अभिनव बँकेच्या बालाजी हाईट्स शाखेतील एटीएम केंद्रातून १८ लाख ९१ हजार रुपये काढून बँकेची फसवणुक केली. पोलिसांनी एटीएम केंद्रातील, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रण तपासून याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.