गणपत्ती बाप्पाला फुले, हार, प्रसाद आणण्यासाठी बाजारात गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाला दोन भामट्यांनी भुरळ घालून, त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील सोन्याची साखळी, अंगठी असा एकूण ६० हजाराचा ऐवज काढून घेऊन पळ काढला. शनिवारी संध्याकाळी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील नाना पावशे चौकात ही घटना घडली.
हेही वाचा >>> डोंबिवली जवळील खंबाळपाडा येथे गुटख्याचा एक लाखाचा साठा जप्त
डोंबिवली, कल्याण परिसरात रस्त्याने चाललेल्या नागरिकांना संमोहित करुन भुरळ घालून लुटण्याचे प्रकार वाढल्याने नागरिक चिंताग्रस्त आहेत. तर अशा भुऱट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.कोळसेवाडी पोलिसांनी सांगितले, पारसनाथ चौथी गुप्ता (७१, रा. गुलमोहर सोसायटी, लक्ष्मीनगर, गोरेगाव पश्चिम, मुंबई) हे कल्याण मधील कोळसेवाडी भागात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे गणपती निमित्त आले आहेत. गणपती पुजेसाठी प्रसाद, हार, फुले सकाळच्या वेळेत लागतील म्हणून शनिवारी संध्याकाळी तक्रारदार पारसनाथ गुप्ता हे कोळसेवाडी भागातील नाना पावशे चौकात पुजा साहित्य खरेदीसाठी आले होते. साहित्य खरेदी केल्यानंतर ते पुन्हा घरी जात असताना त्यांना नाना पावशे चौकात श्री मेडिकल जवळ दोन अनोळख इसम भेटले. त्यांनी पारसनाथ यांना काही कळण्याच्या आत भुरळ घातली. ‘तुम्ही वृध्द आहात. तुम्हाला कोणीही लुटू शकते. त्यामुळे तुमच्या गळ्यातील हातामधील सोन्याचा ऐवज तुम्ही पिशवीत ठेवा’ असे सांगू लागले. त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी, बोटातील अंगठी काढून पिशवीत ठेवण्याचा बहाणा करुन दोन्ही भामटे पारसनाथ यांची नजर चुकवून, हातचलाखी करुन पळून गेले.
हेही वाचा >>> मुंबई-नाशिक महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात ; वाहन चालक जखमी
पारसनाथ घरी येऊन भानावर आले. त्यावेळी त्यांना गळ्यातील सोनसाखळी, हाताच्या बोटातील अंगठी गायब असल्याचे आढळले. त्यांना रस्त्यामध्ये दोन अज्ञात इसम भेटले होते. त्यांनीच आपली फसवणूक केली असल्याची खात्री झाली. पारसनाथ यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.
डोंबिवलीत विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत अशा प्रकारची घटना मागील १५ दिवसापूर्वी घडली होती. या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी टिटवाळा बल्याणी भागातून अटक केली होती. कल्याण, डोंबिवली शहरा लगतच्या बेकायदा चाळी, झोपड्या ही चोरट्यांची आश्रयस्थाने झाली आहेत. त्यामुळे शहरात चोरी करुन त्यांना झटपट आपल्या निवासाच्या ठिकाणी लपून राहता येते. कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन अशा बेकायदा बांधकामांवर आक्रमकपणे कारवाई करत नसल्याने त्याचा फटका शहरातील नागरिकांना फसवणूक, चोऱ्यांच्या माध्यमातून बसत आहे.