ठाणे – शहरात दिवसगणिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये मोबाईल चोरी, सोने चोरीच्या घटना घडत असतात. मात्र ठाण्यातील टिकुजिनी वाडी येथील गटाराचे झाकणही चोरट्यांनी सोडले नसल्याचे उघडकीस आले आहे. बुधवारी मध्यरात्री दोन चोरांनी गटावरील झाकण उखडून रिक्षात नेत असल्याचे सिसिटिव्ही चित्रण व्हायरल होत आहे. त्यामुळे आता चोरट्यांना गटारावरील झाकणही सोडवेना अशा चर्चा असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे शहरात दिवसभरात अनेक गुन्ह्यांची नोंद होत असते. फसवणूक, चोऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मोबाईल, मंगळसूत्र, पाकिट चोरी होत असते. चार दिवसांपुर्वी चोरट्यांनी किसनगर येथील पाडा क्रमांक एक मधील एका मंदिरात चोरी केली होती. यामध्ये मंदिरातील नऊ पैकी सात दानपेट्या चोरांनी गायब केल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच आता चोरट्यांनी गटारावरील झाकण चोरण्याचाही मोह आवरत नसल्याचे दिसून आले. ठाण्यातील कल्पतरू हिल्स येथील टिकुजिनी वाडीच्या समोरील गटारावरील झाकण चोरण्यासाठी चोरटे आले होते. त्यांनी हे झाकण नेण्यासाठी रिक्षाचा वापर केला. दोघांनी हे झाकण उखडून रिक्षात टाकून तेथून पळ काढल्याचे सिसिटिव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे आता लोखंडी झाकणही चोरटे सोडत नसल्याचे दिसून येत आहे.