रस्त्याने पायी चाललेल्या ज्येष्ठ नागरिक महिला, पुरूषांना लक्ष्य करायचे. त्यांच्या जवळ दुचाकीवरून वेगाने जायाचे आणि गळ्यातील सोन्याचा ऐवज हिसकावून पळून जायाचे, अशी नवीन क्लृप्ती चोरट्यांनी शोधून काढली आहे. सोमवारी दिवसभरात कल्याण शहराच्या विविध भागात घडलेल्या चार घटनांमध्ये चार लाख ५० हजार रूपयांचा सोन्याचा ऐवज चोरट्यांनी हिसकावून नेला.

असाच प्रकार काही दिवसांपासून डोंबिवली पश्चिमेत सुरू आहे. डोंबिवलीतील विविध भागातील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, महिला रेतीबंदर मोठागाव, नवापाडा गणेशनगर खाडी किनारी सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी येतात. भुरटे चोर अशा पादचाऱ्यांवर लक्ष ठेऊन सोन्याचा ऐवज असलेल्या पादचाऱ्याला गाठून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळून जाण्याचे प्रकार वाढले आहेत. उमेशनगर बाजारपेठेत रात्रीच्या वेळेत सोनसाखळीचे हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. या भुरट्या चोऱ्यांमुळे ज्येष्ठ नागरिक भयभीत आहेत.

दुचाकीवरील दोन भामटे वर्दळीच्या रस्त्यांवरून जात असलेल्या पादचाऱ्याच्या गळ्यात सोनसाखळी, मंगळसूत्र, गंठण इतर काही ऐवज दिसतो का याची टेहळणी करतात. त्या पादचऱ्याला कळून न देता त्याचा दुचाकीवरून पाठलाग करतात. पादचारी रस्त्यावर एकाकी आणि गर्दीतून बाहेर पडला की त्याच्या अंगावर वेगाने दुचाकी नेऊन भामटे त्या ज्येष्ठ नागरिकाला घाबरवितात. या गोंधळाचा गैरफायदा घेत भामटे ज्येष्ठ महिला, पुरूषांच्या गळ्यातील ऐवज हिसकावून पळून जातात.

गुन्ह्यांचे प्रमाण रोखण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेतून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. तरीही भामटे चोरीची हिम्मत करत असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

ऐवज लंपास

कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील काली त्रिवेदी (६७) सोमवारी सकाळी सात वाजता दूध आणण्यासाठी डेअरीमध्ये चालले होते. दुचाकीवरील दोन तरूण वेगाने त्यांच्या दिशेने आले. काली यांच्या गळ्यातील ९७ हजार रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून पळून गेले. याच रस्त्यावरील म्हसोबा मैदान चिकनघर येथे ॲलन लुईस (६५) चर्चमधील प्रार्थना उरकून घरी जात होत्या. त्यांच्या पाठीमागून दुचाकी स्वार आले. त्यांच्या गळ्यातील एक लाख २० हजार रूपये किमतीचे सोन्याचे लाॅकेट हिसकावून पळून गेले. या दोन्ही प्रकरणात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांधारी नदी परिसरात सकाळच्या वेळेत पती बरोबर फिरण्यासाठी गेलेल्या विजया बामणे यांच्या गळ्यातील ७२ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकी स्वारांनी खेचून पळ काढला. खडकपाडा पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दोन अज्ञात इसमांविरुध्द गुन्हा दाखल केला. कल्याण पूर्वेत काटेमानिवलीतील साकेत बंगल्याजवळून लिला गोपाळकृष्ण (७८) सोमवारी पायी चालल्या होत्या. चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ९६ हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रारी केली.

पोलिसांकडून जनजागृती

डोंबिवली पश्चिमेत भुरट्या चोरट्यांना कडून सावध राहण्यासाठी रहिवाशांनी जागृत राहावे, ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी यासाठी विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी विविध भागात फलक लावले आहेत. प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत सकाळ, रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader