भारतीय बाजारपेठेत अतिशय वेगाने धावणाऱ्या १५० ते २०० सीसी इंजिन क्षमता असलेल्या महागडय़ा मोटारसायकल आल्या असून त्याचा फायदा सोनसाखळी चोर पुरेपूर घेऊ लागले आहेत. सोनसाखळी चोरी करताना पोलिसांच्या तसेच नागरिकांच्या तावडीत सापडू नये म्हणून चोरटे अशा मोटारसायकलींचा वापर करत आहेत. या मोटारसायकलींच्या वेगावर त्यांचे चांगलेच नियंत्रण असून एखाद्या प्रशिक्षित ‘बाइक रायडर’प्रमाणे चोरटे मोटारसायकल चालवीत आहेत. सोनसाखळी चोरांना अवगत असलेल्या या कलेमुळे पोलीसही चक्रावले आहेत.
महिलांच्या गळ्यातील दागिने खेचून पळताना अनेक सोनसाखळी चोरांना पोलिसांनी पकडले असून या चोरटय़ांकडे भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या १५० ते २०० सीसी इंजिन क्षमतेच्या मोटारसायकली सापडल्या आहेत. शहरात सोनसाखळीपाठोपाठ मोटारसायकल चोरी होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या वाहनांच्या चोरीतही सोनसाखळ्या चोरांच्या मोठय़ा टोळ्या सहभागी झाल्या आहेत. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात अटक केलेल्या चोरांकडे मोटारसायकली सापडल्या असून त्यापैकी काही मोटारसायकली चोरीच्या असल्याचे तपासात अनेकदा समोर आले आहे. शहरातील मोटारसायकली चोरायच्या आणि त्यांचा वापर सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ासाठी करायचा, असा नवा उद्योग सोनसाखळी चोरांनी सुरू केल्याचे दिसून येते. गर्दीच्या ठिकाणी चोरटे महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा करतात. अनेकदा दक्ष नागरिक सोनसाखळी चोरांच्या घटनेविषयी पोलिसांना कळवितात. तसेच मोटारसायकलचा क्रमांक आणि चोरटय़ाच्या वर्णनाविषयी माहिती देतात. यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क होते आणि गस्तीवर असलेले पोलीस चोरटय़ाचा पाठलाग करतात. मात्र, या पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून चोरटे महागडय़ा गाडय़ा वापरतात. तसेच एखाद्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचल्यानंतर कोणत्या मार्गे कुठून आणि कसे पलायन करायचे, याचे उत्तम ज्ञान सोनसाखळी चोरांना असते. यामुळे चोरटे सहसा पोलिसांच्या हाती लागत नाहीत. सोनसाखळी चोर ‘बाइक राइडिंग’चे प्रशिक्षण घेत असावेत आणि त्याची केंद्रे शहरातच असावीत, असा संशय आता व्यक्त होऊ लागला असून पोलीसही त्या दिशेने तपास करू लागले आहेत.
नीलेश पानमंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा