डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका येथे सोमवारी रात्री गोळवली येथे राहणाऱ्या एका फूल विक्रेत्याला चार तरुणांनी चाकूचा धाक दाखवून लुटले होते. त्याच्या जवळील फूलविक्रीतून मिळालेली आणि इतर अशी एकूण १९ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लुटून नेली होती. कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी डोंबिवलीतील पाथर्ली नाक्यावरील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीतून दोन लुटारुंना अटक केली. दोघांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा- ठाणे : आगीमुळे इमारतीत अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका
यामधील एक आरोपी सराईत, पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे. पोलिसांनी सांगितले, तक्रारदार फूलविक्रेता देवेंद्र राजभर गोळवली येथे राहतात. ते फूल विक्रीचा व्यवसाय करतात. सोमवारी रात्री साडे दहा वाजता ते डोंबिवली पूर्वेतील शेलार नाका येथील शिव मंदिराजवळील एका हातगाडीजवळ उभे राहून पाणी पुरी खात होते. तेवढ्यात चार तरुण देवेंद्र यांच्या जवळ आले. त्यांनी देवेंद्र यांना दमावर घेऊन ‘येथे काय करतोस,’ असे बोलून त्यांना पकडून ठेवले. त्यांना गप्प उभे राहण्यास सांगून, त्यांचे हात पकडले. एका तरुणाने देवेंद्र यांच्या पोटाला चाकू लावला. ‘तू आवाज केला तर तुला ठार मारू,’ अशी धमकी दिली. अचानक घडलेल्या या प्रकाराने फूलविक्रेता, पाणी पुरी विक्रेता घाबरला. इतर ग्राहक तेथून पळून गेले. तीन जणांनी देवेंद्र यांच्या खिशातील फूल विक्रीतून मिळालेली आणि इतर खर्चासाठीची एकूण १९ हजार रुपयांची रक्कम तरुणांनी लुटून नेली.
हेही वाचा- Video: प्लास्टिकमुळे लागला मध्य रेल्वेला ब्रेक; धावत्या लोकलखाली प्लास्टिक आल्यामुळे चाकाला लागली आग
लुटारु तरुण यांची नावे देवेंद्र यांना माहिती असल्याने रामनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली. कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मोहन कळमकर, उपनिरीक्षक नवनाथ कवडे, हवालदार अनुप कामत, बालाजी शिंदे, बापूराव जाधव, विलास कडू, सचिन वानखेडे, गोरक्ष रोकडे यांनी सापळा लावून डोंबिवलीतील त्रिमूर्ती झोपडपट्टीतून शिवा तुसांबड (१९), आकाश उर्फ वाणी हिरू राठोड (२१) यांना अटक केली आहे. शिवा हा सराईत गुन्हेगार आहे. मोठा चंद्या, छोटा चंद्या या दोन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.