डोंबिवली : येथील एका दारू विक्री दुकानाचे मुख्य प्रवेशव्दार रात्रीच्या वेळेत फोडून दुकानातील आठ लाख रुपयांची रक्कम चोरुन नेणाऱ्या तीन चोरट्यांना रामनगर पोलिसांनी मुंब्रा भागातून गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून साडे तीन लाखाची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे, अशी माहिती डोंबिवली विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.
कल्याण येथे राहणारे रवींद्र शेट्टी यांचे डोंबिवलीत डिलक्स वाईन दुकान आहे. रविवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाचे मुख्य प्रवेशव्दार लोखंडी कटावणीने उघडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील तिजोरीतील आठ लाख रुपयांची दैनंदिन व्यवहारातील रक्कम चोरुन नेली. दुकान मालक रवींद्र सकाळी दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दिसले. रामनगर पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली.
हेही वाचा >>> ठाणे : मयुर शिंदे याच्या अटकेनंतर ठाण्यातील राजकारण तापले
पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, साहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश सानप, हवालदार पी. के. भणगे, विशाल वाघ, नितीन सांगळे, शिवाजी राठोड, निसार पिंजारी, कोळेकर, लोखंडे यांचे विशेष तपास पथक तयार केले. पोलिसांनी वाईन शाॅप परिसरातील सर्व सीसीटीव्ही चित्रण तपासली. तीन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
हेही वाचा >>> पथदिव्यांच्या जिवंत वीज वाहिनीमुळे डोंबिवलीत रहिवाशाचा मृत्यू
पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून तांत्रिक माहितीच्या आधारे मुंब्रा येथील अमृतनगर मध्ये राहणारा सरुद्दीन ताजउद्दीन शेख (३२), शहाबुद्दीन शेख (३२) आणि शिवडी येथील दारुखाना भागात राहणारा जुबेर जलील अन्सारी (२६) यांना अटक केली. तिन्ही चोरट्यांनी चोरीची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरुद्दीनवर मुंबई, ठाणे परिसरातील पोलीस ठाण्यात १५ घरफोडीचे, जुबेरवर १४ गुन्हे दाखल आहेत. या व्यतिरिक्त या चोरट्यांनी किती ठिकाणी चोऱ्या केल्या आहेत याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांडभोर पोलीस करत आहेत.