बदलापूर: ‘आज माजी नगरसेवक म्हणून तुम्हीही भाजप उमेदवाराचा कितीही प्रचार केला तरी उद्याच्या पालिका निवडणुकीत तुम्हाला भाजप उमेदवाराशीच लढायचे आहे. आणि आज तुम्ही ज्यांच्यासाठी प्रचार करता आहात तेच तुमच्याविरुद्ध प्रचाराला येतील ही बाब लक्षात ठेवा’, असा ‘कानमंत्र’ बदलापुरातील शिवसेनेच्या एका ‘दादा’ नेतृत्वाने आपल्या पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. स्थानिक पातळीवरील शिवसेना आणि भाजपातील विसंवादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून संपर्क करत प्रचाराच्या आदेश दिले होते. मात्र स्थानिक पातळीवरील खदखद संपताना दिसत नाही. त्यामुळे संपूर्ण शिवसेना भाजप उमेदवार किसन कथोरे यांच्या प्रचारार्थ उतरेल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुरबाड विधानसभा मतदारसंघात बदलापूर शहरात शिवसेना आणि भाजपात विसंवाद आहे. गेल्या काही आठवड्यात झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे शिवसेना आणि भाजपातील तणाव वाढला आहे. शिवसेनेच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्याला भाजप आमदार किसन कथोरे यांनी भाजपात प्रवेश दिल्याने हा वाद वाढला. त्यानंतर शहरातील वरिष्ठ नेतृत्वासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. मात्र शिवसेनेतील काही बडे माजी नगरसेवक आमदार किसन कथोरे यांच्या प्रचारात सक्रिय झाले असून ते महायुती म्हणून कथोरे यांचा प्रचार करण्यासाठी सुरुवातीपासून आग्रही आहेत. शिवसेनेचे स्थानिक ‘दादा’ नेतृत्व कथोरे यांना विरोध करत आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची पळवा पळवी करायची आणि त्यांच्याकडूनच प्रचाराची अपेक्षा करायची ही दुटप्पी भूमिका असल्याचा युक्तिवाद शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व करत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी कथोरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांची मदत घेतल्याचे बोलले जाते. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक पदाधिकाऱ्यांना कथोरे यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचे सांगितले होते.

आणखी वाचा-परवानगी द्या महाराजांचा पुतळा मुंब्रा शहरात बांधून दाखवतो- आमदार जितेंद्र आव्हाड

मात्र नुकत्याच झालेल्या एका गुप्त बैठकीत शिवसेनेच्या ‘दादा’ नेत्याने कथोरे यांच्या प्रचाराला विरोध केला असून ज्यांना कथोरे यांचा प्रचार करायचा असेल त्यांनी खुशाल करावा. मात्र त्याचवेळी भविष्याचाही विचार करावा, असा सल्ला या नेत्याने दिला आहे. आज कथोरे यांचा कितीही प्रचार केला तरी उद्या तुमच्याविरुद्ध भाजपचाच उमेदवार पालिका निवडणुकीत रिंगणात असेल. त्याच्या प्रचारासाठी किसन कथोरे हेच तुमच्याविरुद्ध येतील. त्यामुळे ही बाब विसरू नका, अशी ही आठवण या नेत्याने शिवसेनेच्या प्रचार इच्छुक पदाधिकाऱ्यांना करून दिली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. काही पदाधिकारी कथोरे यांचा प्रचार करण्यास इच्छुक नाहीत. मात्र अनेकांनी प्रचार करण्यात रस दाखवला आहे. त्यामुळे कथोरे यांच्या प्रचारावरून बदलापुरात शिवसेनेत मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेतील काही नाराजांचा कथोरे यांना किती फटका बसतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Think about future elections before campaigning disgruntled shiv sena leader advise mrj