वनक्षेत्राजवळील वसाहतींत धुमाकूळ

वाढत्या उन्हामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पाण्याचे स्त्रोत कोरडे पडू लागल्याने पाणी आणि खाद्याच्या शोधात माकडांचा ठाण्यातील शहरी भागाकडे प्रवास अलिकडच्या काळात वाढू लागला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, पारसिक डोंगरांच्या जवळ असलेल्या नागरी वसाहती, गृहसंकुलांमध्ये मोठय़ा संख्येने माकडांचा वावर वाढल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून जंगलाच्या आसपास असलेल्या गृहसंकुलात माकडांचा शिरकाव झाल्याच्या अनेक तक्रारी प्राणीमित्र तसेच वन विभागाकडे येऊ लागल्या आहेत.

मार्च महिन्यापासून तापमान कमालीचे वाढले असल्याने जंगलातील पाणवठे या काळात कोरडे पडतात. जंगलात वास्तव्य असणाऱ्या माकडांना पाण्याची कमतरता भासत असल्याने उन्हाळ्यात माकडे शहरात प्रवेश करतात, असा दावा वाइल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन या संस्थेने केला आहे. पाणी आणि खाद्याच्या शोधात माकडे घरात शिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मार्च महिन्यात घोडबंदर, विकास कॉम्पेक्स, कळवा या ठिकाणी माकडे नागरिकांच्या घरात शिरल्याचे प्रमाण वाढले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊर परिसराजवळील नागरी वस्तीत देखील माकडे प्रवेश करण्याचे प्रमाण वाढल्याचे वाइल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन या संस्थेतर्फे सांगण्यात आले.

येऊर परिसरात नियमित फेरफटका मारण्यासाठी येणारे नागरिक माकड दिसल्यास त्यांना खायला काही पदार्थ देतात. त्यामुळे माकडांना जंगल सोडून शहरातील रस्त्यावर खाद्यासाठी येण्याची सवय लागते. उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासल्यावर जंगलातील माकडे आपसूकच पाण्याच्या शोधात शहराकडे वळतात. दोन दिवसांपूर्वी

विकास कॉम्पेक्स या गृहसंकुलात चार माकडे प्राणीमित्रांना आढळल्याचे या संस्थेच्या स्वयंसेवकांनी सांगितले. शहरातील दाट वस्तीची सवय नसलेली माकडे वीजेचा धक्का लागून मृत्यूमुखी पडतात. रविवारी ठाणे स्थानक परिसरात आलेल्या माकडाचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती या प्राणीसंस्थेकडून देण्यात आली.

यंदा तीव्र तापमानामुळे माकडे नागरिकांच्या घरात शिरत असल्याने त्यांना पकडण्यासाठी ठाणे शहरातील नागरिक मोठय़ा प्रमाणात संपर्क करत असल्याचे वाइल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन संस्थेचे आदित्य पाटील यांनी सांगितले.

कृत्रिम जलसाठे

प्राण्यांना पाण्याच्या सोईसाठी वाइल्ड लाइफ वेलफेअर असोसिएशन या संस्थेतर्फे वर्तकनगर परिसरात कृत्रिम जलसाठे तयार करण्यात आले आहेत. तसेच शहरातील माकडांच्या प्रवेशाचे वाढते प्रमाण पाहता विकास कॉम्प्लेक्स येथे या संस्थेतर्फे माकडांविषयी माहिती देणारी जनजागृती करण्यात येणार आहे. माकडांनी जंगल सोडून शहरात प्रवेश करु नये यासाठी नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी तसेच माकड घरात शिरल्यावर नागरिकांनी काय करावे याबाबत माहिती यात देण्यात येईल.

Story img Loader