ठाणे : श्रीकौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे शहरात काढण्यात येणाऱ्या मराठी नववर्षे स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्षे असून यंदा यात्रेत ६० हून अधिक चित्ररथ सहभागी होणार असल्याची माहिती कार्यवाह डॉ. अश्विनी बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण अशा विविध विषयांवरील चित्ररथ यंदा यात्रेत पाहायला मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठाण्यातील श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित मराठी नववर्ष स्वागत यात्रा संदर्भात गुरुवारी ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत यंदाच्या स्वागत यात्रेचे स्वरुप कसे असेल याविषयी माहिती देण्यात आली. स्वागतयात्रा दरवर्षी प्रमाणे श्री कौपीनेश्वर महाराजांच्या पालखीने सकाळी ७ वाजता पारंपरिक प्रथेनुसार वाजत-गाजत प्रस्थान करणार आहे. ठाण्यातील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन पालखी जांभळी नाका, रंगो बापूजी गुप्ते चौक, दगडी शाळा, तलावपाळी, आराधना सिनेमा, हरी निवास चौक, गोखले रोड, राममारुती मार्ग, पु.ना. गाडगीळ चौक, तलावपाळी मार्गे पुन्हा श्री कौपीनेश्वर मंदिरात येईल. यंदा स्वागतयात्रेत सायकलस्वार, मल्लखांब, जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिके, ड्रम-झेंबे वादन, एरियल कसरती, महिला बाईक रॅली आणि प्रबोधनपर चित्ररथांचा समावेश असणार आहे.

स्वागत यात्रेचे रौप्य महोत्सवी वर्षे असल्यामुळे सुमारे ६० हून अधिक चित्ररथ सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या चित्ररथाच्या माध्यमातून ‘प्लास्टिक बंदी’, ‘अवयवदान जनजागृती’, ‘मतदान जागृती’, ‘शून्य कचरा’ असे सामाजिक विषय हाताळले जाणार आहेत. यंदा यात्रेसाठी १०० हून अधिक महाविद्यालयीन स्वयंसेवक नियोजनासाठी उपस्थित राहणार आहेत. या रौप्य महोत्सवी स्वागत यात्रेत जास्तीत जास्त ठाणेकरांनी सहभागी होण्याचे आवाहन श्री कौपीनेश्वर सांस्कृतिक न्यासचे अध्यक्ष उत्तम जोशी, कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यवाह डॉ. अश्विनी बापट यांनी केले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत २२ मार्च रोजी श्रीकौपीनेश्वर मंदिर प्रांगणात महिला पौरोहित्य वर्गाचे रुद्र पठण सायंकाळी ५.३० ते ६.३० आणि नृत्यधारा सायंकाळी ६.४५ ते १० वाजता होईल. २३ मार्च रोजी संत संमेलन, सकाळी १० ते १, २६ मार्च रोजी मृदुला दाढे जोशी यांची संगीत रजनी सायंकाळी ७ ते १०, २६ मार्च रोजी ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ नाटक डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सायंकाळी ८ ते ११ वाजता सादर होईल. २८ मार्च रोजी उपवन तलावावर तर २९ मार्च रोजी मासुंदा तलावावर गंगा महाआरती सायंकाळी ७ ते ८.३० दरम्यान होईल. २९ मार्च रोजी गांवदेवी मैदानात महारांगोळी आणि दीपोत्सवाचे आयोजन आहे.

टीजेएसबी बँकेचा अनोखा चित्ररथ

दरवर्षी ठाणे जनता सहकारी बँक स्वागत यात्रेमध्ये सहभागी होत असते. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने, मुळाक्षरे, बाराखडी याचा अर्थशास्त्रासोबत असलेला संबंध उलगडून सांगणारा अनोखा चित्ररथ या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचे स्वागताध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितले.