ठाणे : ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई-एमसीएचआय ठाणे या संस्थेकडून यंदाही शहरात मालमत्ता प्रदर्शनाच्या माध्यमातून गृहउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात शंभरहून अधिक गृहप्रकल्पांचा समावेश असून या प्रदर्शनात विनामुल्य प्रवेश असणार आहे. प्रदर्शन स्थळापर्यंतच्या प्रवासासाठी ठाणे पूर्व येथून मोफत बसगाड्यांची सुविधा उपलब्ध देण्याबरोबरच पुनर्विकास, महारेरा विषयावर परिसंवाद आणि गृहनिर्माण संस्थांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर या प्रदर्शनात व्ही.आर कंपनीच्या स्टाॅलवर ठाणे शहराची आभासी पद्धतीने हेलिकाॅप्टर सैर करण्यात येणार आहे.
ठाणे येथील पोखरण रोड क्रमांक १ वरील रेमंड कंपनीच्या मैदानात १६ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० यावेळेत २१ व्या मालमत्ता प्रदर्शनांतर्गत गृहउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गृहउत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर रेमंड उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे उपस्थित असणार आहेत. या उत्सवात ठाणे शहरातील शंभरहून अधिक गृहप्रकल्प असणार आहेत. ५० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग असणार आहे. १५ हून अधिक बँका व गृहकर्ज वित्तीय संस्था सहभागी होणार आहेत. या उत्सवात शंभरहून अधिक गृहप्रकल्पांचा समावेश असून या प्रदर्शनात विनामुल्य प्रवेश असणार आहे. प्रदर्शन स्थळापर्यंतच्या प्रवासासाठी ठाणे पूर्व येथून मोफत बसगाड्यांची तसेच मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध देण्यात येणार आहे, अशी माहिती क्रेडाई-एमसीएचआय ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना गृहकर्जाबरोबरच विविध स्तरांतील घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यंदाच्या प्रदर्शनाला घरखरेदीसाठी उत्सुक असलेले २० हजारांहून अधिक कुटुंबे भेट देतील, असे ठाणे प्रदर्शन समितीचे अध्यक्ष संदीप माहेश्वरी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला संस्थेचे पदाधिकारी मनिष खंडेलवाल, गौरव शर्मा, जय व्होरा, निमित महेता, भावेश गांधी, सचिन मिराणी आणि संस्थेचे माजी अध्यक्ष शैलेश पुराणिक हे उपस्थित होते.
परिसंवाद आणि व्याख्यान कार्यक्रम
यंदाच्या प्रदर्शनात १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता ‘कल आज और कल- महारेरा’ याविषयावर प्रसिद्ध सनदी लेखापाल (सीए) अश्विन शाह यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यान कार्यक्रमातून नागरिकांना महारेरा कायद्याविषयी सविस्तर माहिती नागरिकांना जाणून घेता येणार आहे. त्याचबरोबर १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘ठाणे शहराचा पुनर्विकास’ याविषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये ॲम्बियन्स डिझाइन प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व वास्तू विशारद मकरंद तोरसकर, साकार आर्किटेक्टचे वास्तुविशारद मकरंद पारंगे, ॲड प्रसन्न माटे आणि ठाणे जिल्हा गृहनिर्माण फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे हे सहभागी होणार आहेत. ठाणे शहरातील जुन्या इमारतींबरोबरच पुनर्विकासासाठी इच्छुक असलेल्या सोसायट्यांची संख्या वाढत आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारचे धोरण रहिवाशांच्या हिताचे असावे, अशी नागरिकांची मागणी आहे. त्या दृष्टीने या विषयावर चर्चा करण्याबरोबरच पुनर्विकासासाठी महत्वाचे मुद्दे प्रकाशात आणण्यासाठी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, असे जितेंद्र मेहता यांनी सांगितले.
गृहनिर्माण संस्थांसाठी स्पर्धा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वच्छता आभियानाला उत्स्फुर्तपणे पाठींबा देत क्रेडाई-एमसीएचआय ठाणेच्यावतीने आणि ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनच्या सहकार्याने ठाणे शहर आणि जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांसाठी ‘स्वच्छ गृहनिर्माण सोसायटी’ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. यातील ठाणे शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येकी ८ विजेत्या संस्थांना रोख रक्कमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याची नावे १८ फेब्रुवारीला जाहीर केली जाणार आहेत. तसेच १७ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता मिस ॲण्ड मिसेस या ठाणे फॅशन शो चे आयोजन करण्यात येणार आहे, असेही जितेंद्र मेहता यांनी सांगितले.