ठाणे : शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या संकल्पनेतून १४ ऑगस्टला मध्यरात्री साजरा होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रमात गेल्यावर्षी शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण होते. यंदा ठाकरे गटाने स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची जागा बदलून ठाण्यातील चंदनवाडी येथील पहिल्या शिवसेना शाखेत ध्वजारोहण केले तर, शिंदे गटाने पुर्वीच्या ठिकाणी म्हणजेच तलावपाळी येथील जिल्हा शाखेत ध्वजारोहण केले. यामुळे यंदा दोन्ही गटातील संघर्ष टळल्याचे दिसून आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी १९७५ मध्ये १४ ऑगस्टला मध्यरात्री स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ठाणे  येथील तलावपाळी परिसरातील शिवसेनेच्या जिल्हा शाखेच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडला होता. तेव्हापासून या कार्यक्रमाला सुरूवात झाली असून ही परंपरा आजही कायम आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम साजरा होतो. याठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ध्वजारोहण करण्यात येते. याठिकाणी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात. गेल्यावर्षी शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेतही मोठी फुट पडली.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील निळजे गावात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

या फुटीनंतर गेल्यावर्षी झालेल्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमाला शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही गट आमने-सामने आल्याने परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी बंदोबस्त वाढविला होता. यंदाच्या कार्यक्रमातही असेच चित्र दिसून येण्याची शक्यता वर्तविला जात होती. परंतु दोन्ही गटाचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी पार पडल्यामुळे हा संघर्ष टळल्याचे दिसून आले. शिंदे गटाने पुर्वीच्या ठिकाणी म्हणजेच तलावपाळी येथील शिवसेनेच्या ठाणे जिल्हा शाखेत स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, रविद्र फाटक, ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा >>> घोडबंदर मार्गावर रात्रीच्या वेळेत वाहतूक बदल; तुळई बसविण्याचे कामासाठी वाहतूक बदल

ध्वजारोहणानंतर याठिकाणी शिवसैनिकांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. तर, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी ठाणे शहरातील शिवसेनेची पहिली शाखा असलेल्या चंदनवाडी शाखेत स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष राजू पाटील (पूर्व सैनिक) यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाची अमर ज्योत प्रज्वलित करून भारतीय सैन्यात ज्यांनी आपले प्राण गमावले, त्या शुरवीरांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. या भारतीय सैन्यातील वीरपत्नी, वीरमाता व पिता या सर्वांना सन्मानित करण्यात आले. त्यानंतर निवृत्त पोलीस महासंचालक के. पी. रघुवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी ठाकरे गटाचे शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे जथे हातात मशाली घेऊन दाखल झाले होते. याठिकाणी शिवसैनिकांची मोठी गर्दी दिसून आली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This year the conflict between thackeray and shinde factions was avoided two groups venues independence day event ysh