मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विरोधी पक्षांना खडेबोल
कल्याण: अदानी उद्योग समूहात २० हजार कोटी कोणाचे आहेत, या विषयावरून काँग्रेसने देशभर आंदोलने सुरू केली आहेत. अदानी उद्योग समूहाने घोटाळा केल्याचा आरोप करत विरोधी पक्षांकडून आंदोलने सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी उद्योग समूहाबाबत केलेल्या वक्तव्यातून बोध घ्यावा आणि आपली भूमिका निश्चित करावी, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.
कल्याणमधील फडके मैदानावरील ‘एमसीएचआय’च्या गृहप्रकल्प प्रदर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने अदानी समूहाची पाठराखण करणारे वक्तव्य केल्याने ते नक्कीच विचारपूर्वक केले असावे. या वक्तव्यापासून अदानी समूहा विरोधात आंदोलन करणाऱ्या पक्षांनी बोध घ्यावा, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सामान्यांना परवडणारी घरे विकासकांना बांधता यावीत म्हणून काही महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विकासकांनी या निर्णयांचा अधिक लाभ घेऊन परवडणाऱ्या घरांची अधिक उभारणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले. ठाणे-भिवंडीकडून कल्याणमध्ये येणारी मेट्रो आधारवाडी, खडकपाडा मार्गे उल्हासनगरला नेण्याचे नियोजन आहे.
कडकसिंगमुळे खडखडाट
राज्यात विकास कामे हवी असतील तर केंद्र सरकार बरोबरचे संबंध चांगले असावे लागतात. आम्ही ते चांगले ठेवले. आणि विकास कामांसाठी भरपूर निधी आणला. ती कामे मार्गी पण लावली. यापूर्वीच्या सरकारमधील काही मंडळी अहंकारी होती. आमच्याकडे तो नाही. काही मिळवायचे असेल तर विनंती करावी लागते. त्यासाठी कडकसिंग बनून काही उपयोग नसतो, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.