लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांवर इमारती, बंगल्यांच्या कोपऱ्यांवर रात्रीच्या वेळेत किंवा वाहनांमधून जाताना काही बेजबाबदार नागरिक ठराविक ठिकाणी नियमित कचरा टाकून देतात. त्यामुळे त्या भागात कचराभूमी तयार होते. स्थानिक नागरिक पुढाकार घेऊन हा कचरा उचलून तो पालिकेच्या घंटागाडीत टाकतात. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, असे स्थानिक नागरिक वारंवार आवाहन करूनही कचरा टाकणारे ऐकत नसल्याने एमआयडीसीतील रहिवाशांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना गाढवाची उपमा दिली आहे.
डोंबिवली एमआयडीसीतील मिलापनगर, सुदर्शननगर परिसर स्वच्छ सुंदर राहील यासाठी स्थानिक रहिवासी प्रयत्नशील असतात. अनेकदा रहिवासी रविवार, सुट्टीच्या दिवशी एकत्र येऊन आपल्या बंगला, इमारत परिसरात सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा, झाडांचा पालापाचोळा उचलून जमा करून तो कल्याण डोंबिवली पालिकेच्या घंटागाड्यांच्या माध्यमातून विल्हेवाटीसाठी पाठवून देतात.
अशाप्रकारे एमआयडीसीतील रहिवासी आपल्या घर परिसरात स्वच्छता करतात. परंतु, काही बेजबाबदार नागरिक घरातील कचरा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून तो पालिकेच्या ताब्यात न देता तो एमायडीसीतील सार्वजनिक ठिकाणी इमारतीच्या, बंगल्याच्या कोपऱ्यावर फेकून देतात. अशाप्रकारचा कचरा अनेक ठिकाणी एमआयडीसीत पाहण्यास मिळतो. आपण आपला परिसर स्वच्छ ठेवतो. मग बेजबाबदार नागरिकांचा आपल्याला कशाला त्रास असा विचार नागरिक करत आहेत.
सुदर्शननगर भागात काही भागात नियमित सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जातो. पालिकेने शहरात कुठेही कचराकुंड्या ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे काही नागरिक घरातून बाहेर पडल्यावर कचरा घेऊन बाहेर पडतात आणि आपल्याला कोणीही पाहत नाही असे समजून सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकून देतात. एका नागरिकाने कचरा फेकला की त्याठिकाणी अन्य नागरिकही कचरा टाकण्यास सुरूवात करतात.
या नियमितच्या त्रासाला कंटाळुन एमआयडीसीतील रहिवाशांनी कचरा पडणाऱ्या ठिकाणी आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ‘ कृपया येथे कचरा टाकू नये. आणि कचरा टाकला तर ‘मी गाढव आहे म्हणून मी येथे कचरा टाकत आहे’ असे फलक कचऱ्यांच्या ढिगांच्या परिसरात लावले आहेत. हे फलक बघून तरी बेजबाबदार नागरिक स्वतामध्ये सुधारणा करून शहर स्वच्छतेसाठी हातभार लावतील, असा विश्वास एमआयडीसीतील रहिवासी राजू नलावडे यांनी व्यक्त केला आहे.कल्याण डोंबिवली पालिकेने अशा सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकणाऱ्या नागरिकांवर पाळत ठेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू करावी, अशी मागणी एमआयडीसीतील जाणकार नागरिकांनी केली आहे.