दिवाळखोरीस निघालेल्या कंपनीकडून शून्य प्रतिसाद, शाखांना टाळे
गेल्या तीन दशकांपासून बदलापूरसह कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये विविध गुंतवणूक योजनांच्या माध्यमातून गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन केलेली येथील एक कंपनी दिवाळखोरीत निघाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे तब्बल चार हजार गुंतवणूकदारांचे कोटय़वधी रूपये बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या चार महिन्यांपासून व्याजाचे पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात या कंपनीच्या सर्व शाखा बंद झाल्याने गुंतवणूकदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. मात्र त्यापैकी कुणीही अद्याप पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. यासंदर्भात कंपनीच्या संचालकांशी प्रतिक्रियेसाठी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
ठाणे जिल्ह्य़ातील अनेक गुंतवणूक कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या. आता बदलापूर येथील ही तीस वर्षे जुनी कंपनीही त्याच मार्गावर असल्याचे बोलले जाते. गेली तीन दशके बदलापुरात गुंतवणुकीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीने कंपनीच्या माध्यमातून विविध गुंतवणुकीच्या योजना जाहीर करून कोटय़वधी रुपये जमविले. अनेक बदलापूरकरांनी त्यात हजारांपासून लाखो रूपये गुंतवले. त्यात सेवा निवृत्तधारकांचे प्रमाण अधिक आहे. संबंधित व्यक्ती अध्यात्मिक प्रवृत्तीची असल्याने अनेकांचा त्यांचावर प्रचंड विश्वास होता, तसेच विविध योजनांत गुंतवलेल्या पैशांचे व्याज ठरलेल्याच दिवशी कंपनीकडून गुतंवणूकदाराला देण्यात येत होते.
त्यामुळे तीन दशके अनेक गुतंवणूकदारांनी विश्वासाने या कंपनीत पैसे गुंतवले. साधारणत: चार हजार गुंतवणुकदारांनी जवळपास ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीत केली असल्याचे बोलले जाते.
गेल्या चार महिन्यांपासून हे व्याजाचे पैसे मिळणे बंद झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच कल्याण, बदलापूर, ठाणे या शहरांतल्या शाखाही कोणत्याही माहितीशिवाय बंद करण्यात आल्याने अनेक गुंतवणूकदारांनी कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या व्यक्तीच्या बदलापूर येथील निवासस्थानी धाव घेतली.
मात्र मार्च महिन्यापासून ते घर बंद आहे. शिवाय याबाबत कुणीही तक्रार करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अनेकांनी आपली आयुष्यभराची पुंजी या कंपनीत गुंतवली. त्याच्या व्याजातून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. मात्र आता कंपनी बुडाल्याच्या चर्चेने गुंतवणूकदार संकटात सापडले असून ते हतबल झाल्याचे कळते आहे. या कंपनीला निश्चलनीकरणाचा फटका बसल्याचे बोलले जाते.
मुंबईतील वित्तीय संस्थेनेही साथ सोडली
मुंबईतील एका नामांकित वित्तीय संस्थेच्या मदतीने बदलापूरमधील ही कंपनी गुंतवणूकदारांचे पैसे शेअर बाजारात गुंतवत होती. मात्र अशा गैरव्यवहाराची कुणकुण लागताच त्यांनीही या कंपनीशी असलेले सर्व व्यवहार बंद केले असून त्यांनी स्वत:ची वेगळी शाखा बदलापुरात सुरू केली आहे.
नेमका आकडा हाती आल्यानंतरच कारवाई
याप्रकरणाची कुणकुण लागताच स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी गुंतवणूकदारांना पैसे पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या त्यांच्या बदलापूर येथील संपर्क कार्यालयात गुंतवणूकदारांकडून पावत्या जमा केल्या जात आहेत. याबाबत त्यांना विचारले असता, गुंतवणूकदारांचा एकूण आकडा हाती आल्यानंतर पैसे पुन्हा मिळवण्यासाठी काय करायचे याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी तपासासाठी विशेष पथके करण्यात येतील, असे सांगितले.