डोंबिवली – कल्याण शिळफाटा रस्त्यावरील काटई गाव हद्दीत गुरुवारी रात्री एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनीतील पाणी रस्त्यावर आल्याने सुमारे अर्धा ते एक तास शिळफाटा रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.एमआयडीसीची जलवाहिनी फुटण्याची या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. मागील वर्षी सहा वेळा एमआयडीसीची जलवाहिनी फुटली होती. गुरुवारी रात्री काटई गावातील दुर्गा माता मंदिरासमोरील एमआयडीसी ची जलवाहिनी अचानक वॉल जवळ फुटली. अति उच्च दाबाने जलवाहिनीतून पाणी बाहेर येऊ लागल्याने जलवाहिनी शेजारील रहिवासी घाबरले. काही रहिवाशांच्या घरात जलवाहिनीचे पाणी घुसले. शिळफाटा रस्त्यावरील दुतर्फाची वाहतूक ठप्प झाली. जलवाहिनीच्या वरील भागातून उच्च दाबाच्या वीज वाहिन्या गेल्याने पाण्याचा संपर्क येऊन धोका निर्माण होण्याची भीती निर्माण झाली होती.
स्थानिक रहिवाशांनी तातडीने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना कळवले. एमआयडीसीचे अभियंते आणि दुरुस्ती पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जलवाहिनीचा बारवी धरणाकडून येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. जलवाहिनीतील आणि रस्त्यावरील पाणी ओसरल्यानंतर अभियंत्यांनी दुरुस्तीचे काम सुरू केले. शुक्रवारी दुपारपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते.
हेही वाचा >>>रामाचा उत्सव घरोघरी साजरा होणार; दीपोत्सवानिमित्त कंदिलांच्या मागणीत वाढ
शुक्रवारी एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद असतो. त्यामुळे जलवाहिनी फुटली तरी कोणत्याही विभागाला कमी नावाने पाणीपुरवठा होणार नाही. तसे नियोजन अगोदरच करून ठेवलेले असते, असे एमआयडीसीच्या एक अभियंत्याने सांगितले.जलवाहिनीवरील वॉल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर जलवाहिनी फुटते असे अभियंत्याने सांगितले.