कल्याण – कल्याण रेल्वे स्थानक बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक फोन मंगळवारी मध्यरात्री उल्हासनगर येथील मध्यवर्ति पोलीस ठाण्यात दिल्लीतून आला. त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. विविध पोलीस पथके, श्वान पथकाने कल्याण रेल्वे स्थानकाची रात्रीतून तपासणी केली. कोठेही बाॅम्ब, स्फोटके किंवा संशयित व्यक्ति रेल्वे स्थानकावर आढळून आली नाहीत. देण्यात आलेली माहिती खोटी आणि पोलिसांची दिशाभूल करणारी असल्याने फोन करणाऱ्या अज्ञात इसमा विरुध्द उल्हासनगर येथील मध्यवर्ति पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्यवर्ति पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, रात्रपाळीत कर्तव्यावर असताना उल्हासनगरमधील मध्यवर्ति पोलीस ठाण्यात मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास एक फोन पोलीस ठाण्यात आला. आपण दिल्ली येथून बोलतो. कल्याण रेल्वे स्थानक बाॅम्बने उडवून देण्यात येणार आहे, अशी माहिती आपणास अडवाणी नावाच्या इसमाने दिली आहे. त्यामुळे आपण ही माहिती आपणास देत आहोत, अशी माहिती फोन करणाऱ्या अनोळखी इसमाने पोलीस अधिकाऱ्याला दिली. ही माहिती मिळताच, मध्यवर्ति पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती तात्काळ कल्याण रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक, लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा जवान, पोलिसांचे श्वान पथक यांना दिली.

हेही वाचा – कल्याण : तीन महिन्यांत ५७५ कोटीच्या मालमत्ता कर वसुलीचे आव्हान

हेही वाचा – ठाण्यात आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्यासाठी जागा मिळेना

ही सर्व पोलीस तपास पथके तात्काळ कल्याण रेल्वे स्थानकात दाखल झाली. दोन ते तीन तास या सर्व तपास पथकांनी कल्याण रेल्वे स्थानक आणि परिसराची तपासणी केली. बाॅम्ब किंवा संशयास्पद व्यक्ती परिसरात कोठे फिरतात की याची माहिती घेतली. कोठे काही आढळून आले नाही. फोन करणाऱ्या इसमाने कल्याण रेल्वे स्थानक बाॅम्बने उडवून देण्याची खोटी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल केली, सर्व यंत्रणा कामाला लावली म्हणून मध्यवर्ति पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ति विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण दिल्लीतून बोलत असल्याचे सांगितले. त्या इसमाने केलेल्या फोनची चौकशी केली जात आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Story img Loader