डोंबिवली : डोंबिवलीतील भाजपचे कार्यकर्ते कृष्णा परुळेकर यांना गुरुवारी दुपारी एका इसमाने धक्काबुक्की करुन मारहाण केली. नेहरु रस्त्यावरील रेल्वे पादचारी पुलाजवळ हा प्रकार घडला. परुळेकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मारेकऱ्याची ओळख पटल्यावर परुळेकर यांनी पूर्ववैमनस्यातून हा हल्ला आपणावर करण्यात आला आहे, अशी तक्रार पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली. भाजपचे कल्याण ग्रामीण प्रमुख नंदू परब, महिला प्रमुख रेखा चौधरी, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, जिल्हा पदाधिकारी नंदू जोशी यावेळी उपस्थित होते.

परुळेकर हे यापूर्वी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्यावेळी कोपर भागात शिवसेना नगरसेवकाच्या विरुध्द उभे राहिले होते. तेव्हापासून या भागात परुळेकर यांना लक्ष्य केले जात असल्याच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कृष्णा परुळेकर हे बुधवारी दुपारी नेहरु रस्त्याने येऊन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाने घरी पायी चालले होते. रेल्वे पादाचारी पुलावरुन उतरत असताना आरोपी पूजन शुक्ला याने कृष्णा यांना अडवून त्यांना धक्का देऊन त्यांना मारहाण केली. आणि मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा : डोंबिवलीतील पाथर्ली येथे तीन वर्षाच्या मुलाला सावत्र आईने ठार मारले

कृष्णा यांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन याप्रकरणी तक्रार केली आहे. उपनिरीक्षक सुनील पाटील तपास करत आहेत. पूजन हा राजकीय वजनदार नगरसेवकाचा कार्यकर्ता आहे. यापूर्वी कृष्णा यांनी कल्याण डोंबिवली पालिका निवडणूक कोपर प्रभागातून लढविली होती. तेव्हापासून ते काही राजकीय मंडळींच्या नजरेत आहेत असे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.