लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: दोन महिन्यापूर्वी उल्हासनगर मधील झवेरी बाजार येथील एका सराफाच्या दुकानात रात्रीच्या वेळेत चोरी करुन चोरट्यांनी तीन कोटी २० लाख रुपये किमतीचे सहा किलो सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या पथकाने चोरीचा शोध सुरू केला होता. याप्रकरणातील तीन चोरट्यांना नेपाळ सिमेवरुन अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.
माधव गिरी, दिशने रावल, दीपक भंडारी अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश राज्यात गुन्हे दाखल आहेत. नवी मुंबईत कामोठे येथेही त्यांनी चोरी केली आहे.
हेही वाचा… टोईंग वाहनाचे चित्रीकरण प्रसारित करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
उल्हासनगर चोरीतील आरोपी नेपाळच्या दिशेने पळून गेले आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच त्यांनी नेपाळ सिमेवर त्यांचा शोध सुरू केला होता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ५५० ग्रॅम वजनाचे ३३ लाखाचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या आरोपींच्या साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा… मुंब्य्रात दोनशे बेकायदा बांधकामे सुरू; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे पालिकेवर आरोप
गुन्हे शाखेचे उपायुक्त शिवराज पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त नीलेश सोनवणे, राजकुमार डोंगरे या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे, साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव, उपनिरीक्षक स्वप्निल प्रधान, हवालदार संदीप भालेराव, प्रशांत भुर्के, राजेंद्र घोलप, अर्जुन करळे, राजाराम शेगर, रुपवंत शिंदे, किशोर भामरे, नगराज रोकडे, राजकुमार राठोड, नवनाथ कोरडे, सदन मुळे, आशा गोळे, गीताली पाटील यांनी ही अटकेची कारवाई केली.