कल्याण : आपली सैन्य दलात ओळख आहे. आपण तुम्हाला त्या ठिकाणी नोकरीला लावून देतो. या बदल्यात रायगड, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील नऊ बेरोजगार तरूणांकडून एकूण ४६ लाख ५० हजार रूपये उकळून त्यांना नोकरी न देता ते पैसे स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी वापरणाऱ्या डोंबिवली, कल्याणमधील तीन भामट्यांच्या विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिश्चंद्र गणपत जाधव (रा. दर्शन इमारत, चिंचपाडा रस्ता, ज्योतीनगर, कल्याण पूर्व), बाळकृष्ण गावडे (रा. संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर, घाटकोपर), नवनाथ पोपलेकर (रा. देसलेपाडा, डोंबिवली) अशी फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. ज्ञानेश्वर वासुदेव भिलारे (५९) असे फसवणूक झालेल्या नागरिकाचे नाव आहे. ते सेवानिवृत्त आहेत. ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील दिवील गावचे रहिवासी आहेत.
जानेवारी २०२० पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता.
हेही वाचा…डोंबिवलीतील बेकायदा राधाई गृहसंकुल तोडण्यास विरोध केल्याने रहिवाशांसह जमावावर गुन्हे
पोलिसांनी सांगितले, आरोपी हरिश्चंद्र, बाळकृष्ण आणि नवनाथ यांनी संगनमत करून तक्रारदार ज्ञानेश्वर भिलारे यांच्यासह नऊ जणांना जानेवारी २०२० मध्ये संपर्क केला. त्यांनी आपली सैन्य दलात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची चांगली ओळख आहे. आपण सैन्य दलातील नोकरीचे काम या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करून देतो. यापूर्वी अशी कामे आपण केली आहेत, अशी थाप या तीन जणांनी फसवणूक झालेल्या तरूणांना मारली.
ही नोकरी मिळविण्यासाठी प्रत्येकी चार ते पाच लाख रूपये द्यावे लागतील, असे भामट्यांनी तरूणांना सांगितले. सरकारी आणि सैन्य दलात नोकरी मिळते म्हणून तरूणांनी पैशांची जमवाजमव करून पैसे टप्प्याने भामट्यांच्या स्वाधीन केले. हे पैसे भामट्यांनी डोंबिवली पूर्वेतील उंबर्ली रस्त्यावरील विद्यानिकेतन शाळा परिसरातील ओशन हाईट्स इमारतीत आणि महाड येथे स्वीकारले.
हेही वाचा…ठाणे : आर्थिक फसवणुकीसाठी देशासह परदेशात सीमकार्डचा पुरवठा, सीमकार्डचा पुरवठा करणाऱ्या तिघांना अटक
पैसे स्वीकारल्यानंतर वेगवेगळी कारणे देऊन भामटे तरूणांची दिशाभूल करत होते. मुलाखत, वैद्यकीय चाचण्या न करता तरूणांना सैन्य दलातील नेमणुकीची पत्रे मिळणार होती. भामट्यांनी तरूणांना सैन्य दलात नोकरी देण्याची बनावट नेमणूक पत्रे सैन्य दलाच्या शीर्षक पत्रावर तयार केली. ही पत्रे तरूणांना दिली. आपणास कोणतेही कष्ट न घेता सैन्य दलात नोकरी मिळाली या आनंदात तरूण होते. त्यांनी नेमणूक पत्रांची नंतर खात्री केली. त्यावेळी त्यांना ही पत्रे बनावट असल्याचे सांगण्यात आले. तरूणांनी या भामट्यांना संपर्क केला तर त्यांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले. आपले पैसे परत देण्याचा तगादा तरूणांनी लावला तर त्यालाही भामट्यांनी दाद दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे कळल्यावर ज्ञानेश्वर भिलारे यांच्या पुढाकाराने तरूणांनी मानपाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक भारत ढेंबरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.