ठाणे: भिवंडी शहरात अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींचे अटक सत्र सुरू झाले आहे. भिवंडी शहरात वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याविरोधात शांतीनगर, कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

आसिफ आतिक शेख (२४), मोहम्मद आलीम अमजद खान (४०) आणि शरीफुल शेख (४१) अशी अटकेत असलेल्या बांगलादेशींची नावे आहेत. काही महिन्यांपूर्वी ठाणे आणि मुंबई पोलिसांनी अभिनेता सैफ अली खान याच्या हल्ल्याप्रकरणी एका बांगलादेशीला अटक केली होती. या अटकेनंतर ठाणे, मुंबई शहरात राहणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. पोलिसांनी त्यावेळी बांगलादेशींची धरपकड सुरु केली होती. परंतु त्यानंतर ही कारवाई काहीशी थंडावली होती. आता, काश्मीर येथील पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर बांगलादेशींविरोधात ठाणे पोलिसांनी पुन्हा कारवाईचा बडगा सुरु केला आहे.

भिवंडी शहरातील काही भागामध्ये मोठ्याप्रमाणात बेकायदेशीररित्या बांगलादेशी वास्तव्य करतात. टेमघर भागात अवैधरित्या बांगलादेशी वास्तव्यास असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी टेमघर परिसरात शोध घेऊन आसिफ आणि मोहम्मद या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे समोर आले. त्यांच्याविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शरीफुल याला अटक केली आहे. शरीफुल हा मूळचा बांगलादेशमधील ढाका येथील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक मोबाईल जप्त केला आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.