कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना दवाखाने थाटून नागरिकांवर बोगस डाॅक्टरांकडून उपचार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव भिवंडी शहरात उघड झाले आहे. भिवंडी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे भिवंडी शहर पोलिसांनी तीन बोगस डाॅक्टरांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच बोगस डाॅक्टर दाम्पत्याच्या उपचारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच ही कारवाई झालेली आहे. त्यामुळे भिवंडी शहरात मोठ्याप्रमाणात बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा- ठाणे : उल्हासनगरात मुकादमांची लाचखोरी उघड; चार हजारांची लाच घेताना दोघे अटकेत

लक्ष्मीनारायण इगा (४६), नरेश बाळकृष्णा (४९) आणि साहबलाल वर्मा (५२) अशी अटकेत असलेल्या बोगस डाॅक्टरांची नावे आहेत. या तिघांचे शिक्षण जेमतेम दहावी ते १२ पर्यंतचे असून खासगी रुग्णालयांमध्ये वाॅर्डबाॅय म्हणून काम केल्यानंतर त्यांनी परिसरात दवाखाने थाटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हेही वाचा- कल्याण-तळोजा मेट्रो मार्गासाठी सल्लागार नियुक्तीच्या हालचाली; लवकरच निविदा प्रक्रिया होणार सुरु

भिवंडी भागातील काही दवाखान्यांमध्ये बोगस डाॅक्टरांकडून उपचार सुरू असल्याच्या तक्रारी भिवंडी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. जयवंत धुळे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार, महापालिकेच्या आरोग्य विभागाने भिवंडीतील कामतघर आणि भाग्यनगर परिसरात पथके तैनात केली होती. या पथकांनी परिसरातील दवाखान्यांची तपासणी केली. त्यावेळी लक्ष्मीनारायण, नरेश आणि साहबलाल या तिघांकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र पथकाला आढळून आले नाही. याप्रकारानंतर आरोग्य विभागाने याची माहिती भिवंडी शहर पोलिसांना दिली. त्यानंतर डाॅ. जयवंत धुळे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

हेही वाचा- कल्याण : पोलीस असल्याची बतावणी करुन नागरिकांना लुटणारा चोरटा अटक

सुमारे महिन्याभरापूर्वीच भिवंडी शहरात बोगस डाॅक्टर दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. या दाम्पत्याने एका व्यक्तीवर उपचार केले होते. या उपचाराच्या दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. याप्रकारानंतर आणखी तीन बोगस डाॅक्टरांना भिवंडीतून अटक करण्यात आल्याने शहरात बोगस डाॅक्टरांचा सुळसुळाट सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Story img Loader