ठाणे : building collapse in Bhiwandi भिवंडीतील वळपाडा भागात तीन मजली इमारत शनिवारी दुपारी कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले. दहा ते बारा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात असून, त्यांना शोधण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि ठाणे आपत्ती प्रतिसाद दल रात्री उशिरापर्यंत करीत होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वळपाडा येथील कैलासनगर परिसरात वर्धमान कंपाऊंड परिसरात इमारतीच्या तळ आणि पहिल्या मजल्यावर एम.आर.के. फुडस्चे गोदाम आणि कार्यालय होते. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर सदनिका होत्या. या ठिकाणी काही भाडेकरू कुटुंबे राहत होती. दोन मजल्यापर्यंत स्लॅबचे बांधकाम तर, तिसऱ्या मजल्यावर पत्रे बसविण्यात आलेले होते. शनिवारी दुपारी १.४५च्या सुमारास इमारतीचा ७० टक्के भाग कोसळला.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, भिवंडी महापालिकेचे अग्निशमन दल, ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांची पथके दुर्घटनास्थळी दाखल झाली. वैद्यकीय मदतीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरही दाखल झाले होते. जखमींवरील उपचारासाठी भिवंडी येथील इंदिरा गांधी रुग्णालयात विशेष कक्ष सुरू करण्याचे आणि सात रुग्णवाहिका पाठविण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी दिले. जिल्हा रुग्णालयातही उपचारासाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे.

इमारत मालक ताब्यात

इमारत दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या इमारतीचे मालक इंद्रपाल पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच या इमारतीचे बांधकाम ठेकेदार कोण होते, याचाही शोध सुरू आहे, अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली.

इमारतीवर वाढीव बांधकामाचा भार

इमारतीचा ढिगारा मोठा असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली, याबाबत रात्री उशिरापर्यंत माहिती मिळू शकली नाही. या इमारतीवर मोठा मोबाइल टॉवर होता. तसेच पत्र्याच्या खोल्यांचे वाढीव बांधकाम करण्यात आले होते. त्यामुळे इमारतीवर भार वाढून ती कोसळली असावी, अशी चर्चा आहे. 

जखमी : सोनाली परमेश्वर कांबळे (२२) शिवकुमार कांबळे (२.६ वर्ष) मुक्तार रोशन मंसुरी (२६) चिकू रवी मोहतो (५) प्रिन्स रवी मोहतो (३) विकासकुमार मुकेश राजभर (१८ ), उदयभान मुनिराम यादव (२५) अनिता (३०), उज्ज्वला कांबळे (३०).

ट्रक चालू करताना दुर्घटना

भिवंडी इमारत दुर्घटनेत नवनाथ सावंत यांचा मृत्यू झाला. येथील एका कंपनीच्या गोदामातील माल ट्रकद्वारे अन्य ठिकाणी नेण्यासाठी सावंत इमारतीखाली आले होते. माल भरल्यानंतर ट्रक सुरू होत असतानाच अचानक ही दुर्घटना घडली. त्यामुळे सावंत यांचा मृत्यू झाला.

दोन बालके बचावली..

या दुर्घटनेत ललिता रवी मोहतो यांचा मृत्यू झाला. त्यांची दोन मुले बचावली आहेत. चिकू आणि प्रिन्स अशी त्यांची नावे आहेत. प्रिन्सचे वय तीन वर्षे आहे, तर, चिकूचे वय पाच वर्षे आहे. 

कवडसा धरून मुलासह ढिगाऱ्याबाहेर..

इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर परमेश्वर कांबळे हे गेल्या एक वर्षांपासून राहतात. ते एका कंपनीत वाहनचालक आहेत. शनिवारी सकाळी ते कामावर गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी सोनाली (२२) आणि मुलगा शिवकुमार कांबळे (अडीच वर्ष) हे घरात होते. हे दोघे ढिगाऱ्याखाली अडकले होते. सोनाली यांनी शिवकुमारला घेऊन ढिगाऱ्यातून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर ढिगाऱ्याच्या साम्राज्यातून त्यांना एक कवडसा दिसला आणि तेथून त्या मुलासह सुखरूप बाहेर पडल्या.

वाहतूक कोंडीमुळे बचाव कार्याला विलंब

मुंबई : नाशिक महामार्गावरील साकेत आणि खारेगाव टोलनाका येथील खाडीपुलावर दुरुस्तीचे काम केले जात आहे. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक दुपारी काल्हेर, कशेळी भागातून सुरू होता. दुर्घटनेनंतर ठाण्याहून बचाव पथके भिवंडीच्या दिशेने निघाली. परंतु, या भागात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पथकांना वेळेत पोहचणे कठीण झाले. बचावकार्य सुरू असताना रुग्णवाहिकाही वाहतूक कोंडीत अडकत होत्या. ही वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. बचावकार्य सुरू असताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगरे हेही उपस्थित होते.

मृतांची नावे

नवनाथ सावंत (३५), ललिता रवी मोहतो (२९) आणि सोना मुकेश कोरी (५)

‘मृतांच्या नातलगांना पाच लाखांची मदत’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री साहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश त्यांनी दिले. जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three killed in building collapse in bhiwandi 9 injured ysh
Show comments