ठाणे येथील जेल तलावसमोरील राबोडी पुलाखाली राहत असलेल्या एका महिलेच्या पाच महिन्याच्या बाळाचे अपहरण झाल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. या गुन्ह्याचा तपास करून राबोडी पोलिसांनी अवघ्या चार तासात तीनजणांना अटक करून त्यांच्या तावडीतून बाळाची सुखरुप सुटका केली.
जावेद अजमत अली न्हावी (३५), जयश्री याकूब नाईक (४५) आणि सुरेखा खंडागळे (३४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण राबोडी आणि ठाणे परिसरात राहणारे आहेत. आरोपी जावेद याच्यावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ठाणे येथील जेल तलाव समोरील राबोडी पुलाखाली वनिता पवार या त्यांच्या पाच महिन्याच्या मुलांसोबत राहतात. शनिवारी मध्यरात्री त्यांचे बाळ अनोळखी व्यक्तींनी पळवून नेले. पहाटे पाचच्या सुमारास बाळ बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर वनिता यांनी राबोडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल नोंदवली. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन राबोडी पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक दिपक खेडकर, पोलीस हवालदार विक्रम शिंदे, गांगुर्डे, तानाजी अंबूरे, सागर पाटील, प्रकाश जाधव, पंकज दाभाडे, संदीप चव्हाण यांच्या पथकाने चार तासांमध्ये आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करत त्यांच्या तावडीतून बाळाची सुटका केली. बाळाचे अपहरण करण्यामागचा नेमका उद्देश काय होतं, हे अद्याप समजू शकलेले नसून या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भारत मारकड हे करीत आहेत.