ठाणे : मुंब्रा येथील रशीद कंपाऊंड भागातील जिक्रा महल या सात मजली इमारतीची उदवाहक कोसळून सहापैकी तीन जण किरकोळ जखमी झाल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. जखमींमध्ये दोन लहान मुलींचाही समावेश आहे. या उदवाहकाचा रोप तुटल्याने हा अपघात झाला असून या अपघातात उदवाहक सातव्या माळ्यावरून थेट खाली आली.इम्रान शेख ( ३०) आयशा शेख (९ ) आणि इकरा शेख(५ ) अशी किरकोळ जखमी झालेल्यांची नावे आहेत. इम्रान यांच्या कमरेला दुखापत झाली आहे. आयशा शेख हिला मुका मार लागला आहे. तर, इकरा शेख यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
उर्वरीत तीन व्यक्तींना दुखापत झालेली नसून त्यांची नावे समजू शकलेली नाहीत. मुंब्रा येथील कौसा भागातील रशीद कंपाउंड परिसरात जिक्रा महल ही तळ अधिक सात मजली इमारत आहे. या उदवाहकामधून बुधवारी रात्री १० वाजता सहा व्यक्ती जात होते. त्यावेळी या उदवाहकाचा रोप तुटून ती खाली कोसळली. उदवाहक थेट सातव्या मजल्यावरून तळमजल्यावर पडली. या प्रकारामुळे उदवाहकामधील नागरिक भेदरले होते. या प्रकारानंतर इमारतीमधील नागरिकांनी धाव घेऊन उदवाहकातील रहिवाशांना बाहेर काढले. यात उदवाहकमध्ये एकूण सहा व्यक्ती होत्या. त्यातील तीन व्यक्तींना किरकोळ दुखापत झाली होती. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय उपचारासाठी नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.