डोंबिवली: दोन दिवसाच्या कालावधीत डोंबिवली ते कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन महिला आणि एक पुरूषाचा समावेश आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी या मृतांचा ताबा घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ते पालिकेच्या कल्याण मधील रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविले आहेत.
मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी दोन असे तीन मृतदेह रेल्वे सुरक्षा जवानांना ठाकुर्ली, डोंंबिवली आणि कोपर रेल्वे स्थानकांजवळ आढळले. हे तिघे प्रवासी वेगवेगळ्या लोकलने प्रवास करत होते. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांना ही माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा जवानांनी रेल्वे मार्गात पडलेल्या या मृतदेहांचा ताबा घेतला. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
या तिन्ही मृतदेहांची ओळख पटलेली नाही. त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुसाने यांनी सांगितले. दरवाजात उभे असताना बाजुच्या खांबांचा फटका लागून किंवा लोकल मधील गर्दीमुळे दरवाजातून आत शिरता न आल्याने खांंबाचा धक्का लागून हे प्रवासी रेल्वे मार्गात पडले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रवाशांचा रेल्वे मार्गात मृत्यू झाला असला तरी तो कशामुळे झाला आहे हे निश्चित नसल्याने रेल्वे अपघात म्हणून या प्रकरणांची नोंद केली आहे. मृतांच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. – अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंंबिवली लोहमार्ग पोलीस.