ठाणे : घोडबंदर येथील पातलीपाडा भागात सोमवारी रात्री एका मोटारीने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षामधील वाहन चालकासह तीनजण जखमी झाले. याच घोडबंदर मार्गावर सोमवारी सकाळी एका मोटारीने तीन ते चार वाहनांना धडक दिली होती. त्यामुळे सोमवारचा वार अपघात वार ठरल्याची चर्चा आहे. मोहम्मद रंगारी (५५), अश्रत रंगारी (४०) आणि सायमा रंगारी (१८) अशी जखमींची नावे आहेत. तर त्यांच्यासोबत सहा आणि आठ वर्षांची दोन लहान मुले देखील होती. हे सर्वजण रिक्षातून प्रवास करत होते. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई येथून मोटार चालक मोहम्मद तसलीम हे घोडबंदरच्या दिशेने मोटार घेऊन जात होती. त्याचवेळी तसलीम यांचे मोटारीवरील नियंत्रण सुटल्याने मोटारीची रिक्षाला जोरदार धडक बसली. रिक्षामधून मोहम्मद रंगारी, अश्रत सायमा यांच्यासह सहा आणि आठ वर्षांची मुले प्रवास करत होती. यात मोहम्मद, अश्रत आणि सायमा यांना दुखापत झाली. मोहम्मद हे रिक्षा चालवित होते. त्यांच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली. तर अश्रत आणि सायमा यांच्या डोक्याला दुखापत झाला. अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. सोमवारी सकाळी घोडबंदर मार्गावर तत्त्वज्ञान विद्यापीठ परिसरात एका मोटारीने तीन ते चार वाहनांना धडक दिली होती. त्यामुळे घोडबंदर मार्गावरील वाहन चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Story img Loader