डोंबिवली – जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे कुटुंबासह पर्यटनासाठी गेलेले तीन रहिवासी दहशतवादी हल्ल्यात ठार झाले आहेत. या कुटुंबातील एक बालक हाताच्या बोटाला शस्त्रातील गोळी लागल्याने जखमी झाला आहे. संजय लेले (४४), अतुल मोने (५२) आणि हेमंत जोशी हल्ल्यात ठार झालेल्या मृतांची नावे आहेत. संजय लेले यांच्या हर्षल नावाच्या मुलाच्या हाताला बोटी चाटून गेली आहे. त्यामुळे तोही जखमी झाला आहे.अतुल मोने हे डोंबिवली पश्चिमेत ठाकुरवाडी भागात राहतात. मोने पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाम येथे गेले होते. अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ येथील कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. अतुल मोने यांच्या सोबत डोंबिवलीत राहत असलेले हेमंत जोशी आणि संजय लेले हे देखील गटाने पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

संजय लेले हे डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील जाधववाडी भागात राहत होते. तेथे त्यांचा बंगला होता. एकत्र कुटुंब पध्दतीने हे कुटुंब यापूर्वी त्या भागात लेले वाड्यात राहत होते. संजय लेले हे स. वा. जोशी शाळेचे विद्यार्थी होते. मनमिळावू स्वभावाचे संजय लेले नोकरी करत होते, अशी माहिती त्यांचे सहाध्यायी देवीचापाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी सांगितले.

तिन्ही मृतांचे नातेवाईक रात्रीच काश्मीर येथे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी निघाले आहेत. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मृत कुटुंबीयांना संपर्क करून त्यांना पहलगाम प्रवासासह आवश्यक ते सहकार्य, तेथील संपर्काची व्यवस्था केली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, खा. श्रीकांत शिंदे, सागर जेधे अशाच प्रकारचे सहकार्य करत आहेत. शासनस्तरावरून मिळणारी माहिती डोंबिवलीतील मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांना तात्काळ मिळेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. दहशतवादी हल्ल्ल्याचा डोंबिवलीतील विविध संस्था, नागरिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.