कल्याणच्या सांस्कृतिक चळवळीतील बाबुशेठ अग्रवाल यांचा मृतांमध्ये समावेश

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू जवळ भरधाव वेगात असलेल्या एका कारची मालवाहू ट्रकला जोराची धडक बसल्याने कारमधील चार जणांपैकी तीन जण बुधवारी रात्री जागीच ठार झाले. कार गुजरातकडून मुंबई दिशेने येत होती. अपघात ठार झालेले कल्याण मधील एकाच कुटुंबातील सदस्य आहेत. एक तरुण अपघातात थोडक्यात बचावला आहे.

मृतांमध्ये कल्याणच्या सांस्कृतिक चळवळीत महत्वाचे भूमिका बजावणारे श्रीसत्यनारायण उर्फ बाबुशेठ अग्रवाल (८०) यांचा समावेश आहे. त्यांच्या पत्नी सुमित्रा (७८), आशा दीपक अग्रवाल यांचाही जागीच मृत्यू झाला. केतन अग्रवाल (२५) हा थोडक्यात बचावला आहे. त्याला गंभीर दुखापती झाल्या असुन त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात घडताच महामार्ग पोलिसांनी सर्व जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालय तेथून धुंदलवाडी येथील खासगी रुग्णालयात नेले. उपचार सुरू करण्यापूर्वीच बाबुशेठ, सुमित्रा, आशा मृत झाल्याचे डाॅक्टरांनी घोषित केले. केतन जखमी झाला आहे.

हेही वाचा >>> शिळफाटा रस्त्याचे रखडलेले रुंदीकरणाचे काम मार्गी लागणार

अग्रवाल कुटुंबीय एका कार्यक्रमासाठी कल्याण मधून ब्रिझा कारने गुजरात येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून ते पुन्हा त्याच कारने अहमदाबाद मार्गाने मुंबईकडे परतत होते. डहाणू परिसरात असताना भरधाव वेगात असलेल्या ब्रिझा कारच्या चालकाला समोरुन चाललेल्या मालवाहू ट्रकच्या वेगाचा अंदाज आला नाही. सुसाट वेगात असलेली कार ट्रकला मागे टाकुन पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कार जोराने ट्रकच्या पाठीमागील बाजुस धडकली. धडक इतकी जोराची होती की धडकेचा आवाज पंचक्रोशीत पसरला. परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्त्यावरील इतर वाहने या भागात मदतीसाठी थांबली. महामार्ग पोलीस तातडीने घटनास्थळी आले. त्यांनी चारही जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात नेले. त्यानंतर तीन जणांचा खासगी रुग्णालयात नेल्यावर मृत्यू झाला. अपघात होत असताना चालका समोरील बचाव पिशवी उघडल्याने तो बचावला असल्याचे समजते. या घटनेने कल्याण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली: मोकाट बैलाने मारलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा बस खाली चिरडून मृत्यू

बाबूशेठ यांचे समाजकार्य

९० वर्षापासून बाबुशेठ अग्रवाल यांचे कल्याण मध्ये वास्तव्य आहे. कल्याण पश्चिमेतील दत्त आळीत त्यांचे वास्तव्य होते. बाबुशेठ यांचा जन्म कल्याणचा. सुभेदारवाडा शाळेचे ते विद्यार्थी होते. त्यांचा वडिलोपार्जित किराणा वस्तू विक्रीचा व्यवसाय होता. बाबुशेठ यांनी त्याकडे पाठ फिरवून ५५ वर्षापूर्वी अहिल्याबाई चौकात छापखाना सुरू केला. कल्याण नगरपालिकेचे नगराध्यक्ष नामदेव आहेर यांच्या कालावधीत दुर्गाडी किल्ल्यावर देवीच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. कल्याणचे ऐतिहासिक, सांस्कृतिकपण टिकून राहावे म्हणून बाबुशेठ नेहमीच प्रयत्नशील होते. कल्याणचे निवृत्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत देवकुळे, महाराष्ट्र कोल्ड्रिंक्सचे मालक पांडुशेठ निसाळ आणि बाबुशेठ यांनी पुढाकार घेऊन कल्याण संस्कृती मंच संस्थेची स्थापना केली. अनेक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सात दिवसांची व्याख्यानमाला कल्याण मधील पाठारे मैदानात आयोजित करण्यात बाबुशेठ यांचा पुढाकार होता. १९७४ मध्ये कल्याण नगरपालिकेची निवडून त्यांनी लढविली होती, असे ज्येष्ठ शिवसैनिक तुषार राजे यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three people same family kalyan killed horrific accident near dahanu thane news ysh