अंबरनाथ: ऑनलाईन माध्यमातून दररोज फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत असतानाही त्यातून सर्वसामान्य नागरिक बोध घेताना दिसत नाही. उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरात तीन प्रकरणांमध्ये तीन जणांना १२ लाख १७ हजार ९३७ रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी तिन्ही शहरांमध्ये गुन्हे दाखल झाले असून फसवणूक झालेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
अंबरनाथ शहरातील प्रियंका पोकळे या महालक्ष्मी नगर येथे राहणाऱ्या महिलेला घर बसल्या पैसे कमवण्याचे अमिष दाखवत ७ लाख ९१ हजार १८० रुपयांना लुटले. टेलिग्राम युजर आयडी, एक युट्युब खाते सबस्क्राईब करायला त्यांना सांगण्यात आले होते. यातून प्रियंका यांची ऑनलाईन फसवणुक केली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात उल्हासनगर शहरात राहणाऱ्या सुनील वासवानी यांना तुमचे एक पार्सल आले असून त्यात असलेला पत्ता सापडत नाही. त्यामुळे पत्ता सुधारित करावा लागेल. या सुधारणेसाठी पैसे द्यावे लागतील असे सांगून वासवानी यांना एक – एक रुपया खात्यात पाठवण्यास सांगण्यात आले. त्यानंतर वासवानी यांच्या खात्यातून १ लाख ९९ हजार ९९७ रुपये काढण्यात आले.
हेही वाचा >>>“…आणि उरलेली रक्कम बागडे घरी घेऊन जातो”, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप; ट्वीट केली ‘ती’ ऑडिओ क्लिप!
तिसऱ्या प्रकरणात बदलापूर पूर्वेतील पूजा महाजन (२६) यांना ऑनलाईन कार्य पुर्ण केल्यानंतर मोबदला मिळेल या आमिषाने यांच्या विविध बँक खात्यातून २ लाख २८ हजार ६०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. या तिन्ही प्रकरणात तिन्ही पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ऑनलाईन माध्यमातून मिळणाऱ्या अमिषात अनेकदा फसवणुकीचे प्रकार समोर आले असेल तरी नागरिक यातून धडा घेताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.