येथील सिडको बस थांब्याजवळील साई बाबा मंदिराशेजारी उभ्या असलेल्या फालुदा विकणाऱ्या हात गाडीवर गुरुवारी सायंकाळी झाड पडून तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी फालुदा विक्रेत्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, सुकी मच्छी विक्रेती महिला आणि एका पादचाऱ्याला मुक्का मार लागला आहे. या घटनेमुळे शहरातील धोकादायक वृक्षांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा- ठाण्यातील घंटाळी परिसरात गोळीबारामुळे खळबळ, एक जखमी
ठाणे येथील सिडको बस थांबा परिसरात सतत वर्दळ सुरू असते. याच भागातील साई बाबा मंदिराशेजारी उभ्या असलेल्या फालुदा विकणाऱ्या हात गाडीवर गुरुवारी सायंकाळी झाड पडले. त्यात फालुदा विक्रेते लेहरू गुजर (१८, रा. चेंदनी कोळीवाडा) यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. फालुदा गाडी शेजारी बसलेल्या सुखी मच्छी विक्रेत्या हेमलता ठाणेकर (५५, रा. चेंदनी कोळीवाडा) यांच्या कमरेला मूक्का मार लागला आहे. रस्त्यावरून जाणारे पादाचारी विलास सुर्वे (५१, रा. कोलबाड) यांच्या कमरेला व पायाला मुक्का मार लागला आहे. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग, वृक्ष प्राधिकरण विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन झाड कापून बाजूला केले. झाड पडल्यामुळे फालुदा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.