डोंबिवली : शेअर गुंतवणुकीत वाढीव नफा मिळवून देतो, असे सांगून तीन भामट्यांनी ऑनलाईन गुंतवणुकीतून डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी भागात राहत असलेल्या एका ७५ वर्षाच्या सेवानिवृत्त व्यक्तिची २९ लाख ८२ हजाराची फसवणूक केली आहे. मागील तीन महिन्याच्या काळात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.जानेवारीमध्ये सेवानिवृत्त व्यक्तिला त्यांच्या मोबाईलवर आपण शेअर माध्यमातून गुंतवणूक केली तर तुम्हाला झटपट वाढीव नफा मिळेल असा लघुसंदेश आला. एका महिलेने आणि तिच्या तीन सहकाऱ्यांनी सेवानिवृत्ताला गुंतवणुकीसंदर्भात सर्व प्रकारची माहिती दिली. झटपट वाढीव नफा मिळतो म्हणून सेवानिवृत्ताने भामट्यांनी मागितलेली आपली बँकेसह सर्व प्रकारची व्यक्तिगत माहिती भामट्यांना दिली.
टप्प्याने सेवानिवृत्ताने २९ लाख ८२ हजार रूपये जानेवारी ते मार्च या कालावधीत भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर टप्प्याने पाठवली. गुंतवणुकीचे व्यवहार ऑनलाईन माध्यमातून सेवानिवृत्ताला दिसत होते. जानेवारी ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ॲन्गोवन पीआरओ ट्रेडिंग मार्केट कंपनीतील तीन जणांनी सेवानिवृत्ताकडून गुंतवणुकीची रक्कम वसुल केली. गुंतवणुकीच्या रकमेवर आकर्षक व्याजाची रक्कम ऑनलाईन माध्यमातून सेवानिवृत्ताला दिसू लागली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही रक्कम एक कोटी २२ लाख रूपये होती. ३० लाखाच्या गुंतवणुकीवर आपणास एक कोटी २२ लाखाचा निफा मिळाला म्हणून सेवानिवृत्ताने या रकमेतील काही रक्कम काढण्याचा निर्णय घेतला.
ही रक्कम सेवानिवृत्ताने काढण्याचा प्रयत्न केला पण समोरून प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून सेवानिवृत्ताने भामट्यांना संपर्क केला. तेही यासंदर्भात उडवाउडवीची उत्तरे देऊन योग्य माहिती सेवानिवृत्ताला देत नव्हते. यावेळी आपली फसवणूक झाल्याचे सेवानिवृत्ताला जाणवले. त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गु्न्हा दाखल केला आहे.
या फसवणूक प्रक्रियेसाठी भामट्यांनी सात ते आठ मोबाईलचा वापर केला होता. या मोबाईलच्या माध्यमातून व्हाॅट्सप ग्रुप तयार केले होते. या ग्रुपमध्ये सेवानिवृत्ताला ग्रुप ॲडमिन करण्यात आले होते. कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये गेल्या वर्षभरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या माध्यमातून सुमारे ५० हून अधिक नागरिकांनी कोट्यवधीची फसवणूक झाली आहे. कमी कालावधीत झटपट पैसा मिळत असल्याने लोक या आमिषाला बळी पडतात. आपण करत असलेली गुंतवणूक योजना किती रास्त आहे. याविषयीची कोणतीही माहिती नागरिक घेत नाहीत. त्यानंतर त्यांची फसवणूक होते. अशा गुंतवणुकीच्या फसवणूक योजनांपासून नागरिकांनी दूर राहावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.