मीनाताई ठाकरे उड्डाणपुलावर तीन लहान गतिरोधकांची उभारणी

ठाणे : मीनाताई ठाकरे उड्डाणपुलावर झालेल्या गंभीर अपघातांची दखल घेत ठाणे महापालिकेने अपघात टाळण्यासाठी काही उपाययोजना केल्या आहेत. उड्डाणपुलावरील अपघातप्रवण क्षेत्रापासून ५० मीटरवर तीन लहान गतिरोधक बांधण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावेल आणि अपघात टळतील, असा महापालिकेचा दावा आहे. जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या अधिकाऱ्यांनीही या उड्डाणपुलाची पाहणी केली होती.

शहरातील अंतर्गत मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून ठाणेकरांची सुटका व्हावी यासाठी ठाणे महापालिकेने मीनाताई ठाकरे चौक, तीन पेट्रोल पंप आणि नौपाडा येथे उड्डाणपूल बांधले आहेत. यापैकी मीनाताई ठाकरे चौक आणि नौपाडा येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ३ मार्च रोजी उरकण्यात आले. या पुलाचे काम अर्धवट असतानाही केवळ आचारसंहितेचा अडथळा येऊ नये म्हणून पूल घाईघाईने खुला करण्यात आल्याची टीका त्या वेळी विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती.

मीनाताई ठाकरे चौक उड्डाणपुलावर उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी एका तरुणाचा मृत्यू झाला. पुलावर मोठे वळण असून वळणापासून काही मीटरवर पुरेशा पांढऱ्या पट्टय़ा किंवा गतिरोधक नाहीत. त्यामुळे हा भाग अपघातप्रवण झाल्याच्या तक्रारी काही वाहनचालकांकडून पुढे आल्या होत्या. तक्रारी आणि अपघात वाढू लागल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि ठाणे जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे सचिव श्याम लोही यांनी या उड्डाणपुलाची पाहणी केली. त्या वेळी त्यांना अनेक त्रुटी आढळल्या. त्याचा अहवाल त्यांनी महापालिका तसेच वाहतूक विभागाला सादर केला होता.

ठाणे लोकसत्ताने ‘नवा उड्डाणपूल अपघातप्रवण?’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत ठाणे महापालिकेने रविवारी सकाळी उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवून रस्ते सुरक्षा समितीने सुचवलेल्या उपायांची अंमलबजावणी सुरू केली. ज्या ठिकाणी अपघात घडले तिथून ५० मीटरवर तीन लहान गतिरोधक बांधण्यात आले आहेत. या गतिरोधकांमुळे उड्डाणपुलावरून येणाऱ्या वाहनांचा वेग मंदावेल आणि अपघात टळतील, असा महापालिकेचा दावा आहे.