कल्याण – कल्याण रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पांंमधून बहुद्देशीय प्रकल्प उभारण्याची कामे सुरू आहेत. या कामांमुळे काही ठिकाणी खोदकाम तर काही ठिकाणी ढिगारे आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा येत आहे. शनिवारी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात पाणी तुंबल्याने आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून रेल्वे स्थानक भागात कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी रात्री तीन उच्च दाबाचे पंप बसवून तात्काळ साचलेले पाणी उपसण्यात आले.
शनिवारी पहाटेपासून दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागातील दीपक हाॅटेल, एसटी बस आगार, न्यायालय परिसरात पाणी तुंबले होते. या भागात स्मार्ट सिटी प्रकल्पातून उड्डाण पूल, एसटी आगाराच्या जागेत वाहनतळ, पादचारी पूल उभारण्याची कामे सुरू आहेत. या कामांमुळे काही ठिकाणी रस्त्यांवर अडथळे आले होते. बांधकामाचे साहित्य जागोजागी ठेवण्यात आले आहे. या सामानामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी वाट नसल्याने हे पाणी मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानक भागात तुंबून राहत आहे. या तुंबलेल्या पाण्यातून प्रवाशांना वाट काढणे, रिक्षा चालकांना रिक्षा उभ्या करणे अवघड जात होते.
हेही वाचा – अंबरनाथ बदलापूर दरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड, घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल
आयुक्त डाॅ. जाखड यांच्या आदेशावरून शनिवारी संध्याकाळी कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्या उपस्थितीत पालिका कर्मचाऱ्यांंनी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात पाणी तुंंबणाऱ्या ठिकाणी तीन उच्च दाबाचे पाणी उपसा करणारे पंप बसविण्यात आले. संध्याकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वे स्थानक भागात साचलेले पाणी उपसण्यात आले. या भागातील रस्ते मोकळे झाल्यानंतर तात्काळ हिरव्या जाळ्या आणि आडोसे उभे करून या भागातील खड्डे पडलेल्या रस्त्यावर तातडीने डांबरमिश्रित खडी टाकून रस्ते सुस्थितीत करण्यात आले. मुसळधार पाऊस सुरू असताना पालिका आपत्कालीन पथकाचे कर्मचारी, अभियंता रोहिणी लोकरे रात्री उशिरापर्यंत पाणी उपसा आणि रस्ते डांबरीकरण कामासाठी रेल्वे स्थानक भागात तळ ठोकून होते.
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक भागात स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामे सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे या भागात पावसाचे पाणी तुंबत आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशावरून या भागात तीन उच्च दाबाचे पाणी उपसा पंप बसविण्यात आले आहेत. आता या भागात पाणी तुंबणार नाही अशी खबरदारी घेण्यात आली आहे. – रोहिणी लोकरे, कार्यकारी अभियंता.