डोंबिवली : शेअर्समध्ये ऑनलाईन व्यवहारातून गुंतवणूक केल्यास आपणास आकर्षक परतावा मिळेल अशी माहिती भामट्यांनी डोंबिवली, उल्हासनगरमधील तीन महिलांना दिली. या महिलांकडून टप्प्याने ३२ ते ४३ लाख रूपयांच्या रकमा उकळल्यानंतर भामट्यांनी या महिलांना आकर्षक परतावा नाहीच पण त्यांच्या मूळ रकमा परत न करता त्यांची एकूण एक कोटीची फसवणूक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या चार महिन्याच्या कालावधीत डोंबिवली, उल्हासनगरमध्ये या घटना घडल्या आहेत. विठ्ठलवाडी, डोंबिवलीतील टिळकनगर, मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा…मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अडकली संकेतस्थळाच्या कोंडीत, रात्रभर जागुनही ग्रामीण बहिणींना नेट नसल्याने अर्ज भरण्यास मिळेना

डोंबिवलीतील ३० वर्षाच्या एका महिलेला एप्रिलमध्ये एका भामट्याने इन्स्टाग्रामवरून संपर्क केला. या महिलेशी ओळख वाढवून या महिलेला शेअर व्यवहाराच्या माध्यमातून आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखविले. एप्रिल ते जुलै या कालावधीत या महिलेने ३२ लाख ७६ हजार रूपये या भामट्याच्या सूचनेवरून टप्प्याने गुंतवले. चार महिने झाल्यानंतर या महिलेने वाढीव परतावा देण्याची मागणी भामट्याकडे सुरू केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. आकर्षक परतावा नाहीच, पण मूळ रक्कमही भामट्याने लाटल्याने या महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली.

असाच प्रकार डोंबिवलीतील टिळकनगर पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. या प्रकरणात एका ४४ वर्षाच्या महिलेची फसवणूक झाली आहे. मे ते जुलै या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. शेअर गुंतवणुकीतून या महिलेला वाढीव परताव्याचे आमिष दाखविण्यात आले होते. या महिलेने ३३ लाख ५० हजार रूपये या गुंतवणूक योजनेत गुंतविले होते. यामध्ये तिचीही फसवणूक झाली आहे.

हेही वाचा…ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचजवळ पाणी तुंबले

तिसरी घटना उल्हासनगर हद्दीतील विठ्ठलवाडी पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. या घटनेत ३२ वर्षाच्या महिलेला शेअर गुंतवणुकीतून ४३ लाख १० हजार रूपयांना फसविण्यात आले आहे. या महिलेने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत या तीन महिलांना भामट्यांनी एकूण एक कोटी नऊ लाखाला फसविले आहे. ऑनलाईन गुंतवणूक व्यवहार करताना काळजी घ्या. अशा गुंतवणूक व्यवहारांना बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three women defrauded of over 1 crore in online share investment scam in dombivli and ulhasnagar psg
Show comments