ठाणे : भिवंडी येथील कामतघर भागात घराबाहेर खेळत असताना तीन वर्षाच्या मुलाला टेम्पोची धडक बसली. यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालकाविरोधात अटकेची कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कामतघर येथील हनुमाननगर परिसरात तीन वर्षाचा मुलगा त्याच्या कुटुंबासोबत राहतो. रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास तो परिसरात खेळत होता. त्याचवेळी एका टेम्पोने त्याला धडक दिली. टेम्पोचे चाक पायावरून गेल्याने त्याला यात गंभीर दुखापत झाली होती. तसेच त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली होती. सुरुवातीला त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती बिघडल्याने त्याला पुढील उपचारासाठी ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी तपासून त्याला सायंकाळी ६.३० वाजता मृत घोषित केले. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबियांचा जबाब कळवा पोलिसांनी नोंदविला होता. या जबाबानंतर याप्रकरणी गुरुवारी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालकाविरोधात अटकेची कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.