ठाणे : आंतरराष्ट्रीय विमान कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची ३७ लाख ३८ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिळफाटा भागातील एका गृहसंकुलात फसवणूक झालेला व्यक्ती राहतो. तो विमान कंपनीत कामाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या व्हाॅट्सॲप मोबाईल क्रमांकावर एक लिंक आली. ही लिंक शेअर मार्केट संबंधित असल्याने त्यांनी ती लिंक उघडली. त्यांनी एका व्हाॅट्सॲप समूहामध्ये (ग्रुप) प्रवेश केला. त्या समूहामध्ये एका ॲपची लिंक देण्यात आली होती. आयपीओ तसेच शेअर बाजाराबाबतची माहिती मिळत होती. त्यामुळे त्यांनी या ॲपमध्ये त्यांचे खाते सुरू केले. त्या ॲपमधील खाते त्यांनी त्यांच्या बँक खात्याला जोडले. त्यानंतर ३ फेब्रुवारीला त्यांनी या ॲपमधून एका कंपनीचे ३८ हजार रुपयांचे शेअर खरेदी केले. त्यामध्ये त्यांना १४ हजार रुपयांचा नफा झाला. त्यानंतर त्यांनी जमा रकमेपैकी ३५ हजार रुपये काढून घेतले. नफा होत असल्याने त्यांनी ॲपच्या माध्यमातून १३ लाख ३६ हजार रुपयांचे विविध शेअर खरेदी केले. या शेअरवर त्यांना ९४ लाख रुपयांचा नफा दर्शविण्यात आला होता.
हेही वाचा… हाईट बॅरियर तुटल्याने ठाणे बेलापूर मार्गावर मोठी कोंडी
हेही वाचा… ठाण्यात बेकायदा बांधकामांवर हातोडा
ही रक्कम त्यांना त्यांच्या बँक खात्यात जमा करायची होती. त्यांनी ॲपवरून प्रयत्न केले. परंतु रक्कम जमा होत नव्हती. त्यामुळे त्यांनी ॲपमधून ग्राहक क्रमांकाला संपर्क साधला. त्यावेळी त्यांना १० टक्के रक्कम व्यवस्थापनासाठी भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने ३७ लाख ७८ हजार ९६८ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात वर्ग केले. दोन महिने उलटूनही त्यांना त्यांची रक्कम परत मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बुधवारी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.