श्वान हा शब्द ऐकताच अगदी शांत, इमानी, खिलाडूवृत्ती जोपासणारा, प्रेमळ, आज्ञाधारक प्राण्याचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र या सर्व वैशिष्टय़ांना अपवाद ठरणारी श्वानांची एक प्रजात म्हणजे तिबेटियन मॅस्टीफ.
१९०६ मध्ये चीन, मंगोलिया, नेपाळ, तिबेट तसेच भारतातील हिमाचल प्रदेश या भागांत या श्वानांचे वास्तव्य मोठय़ा प्रमाणात आढळून आले. या श्वानांच्या नावातसुद्धा विविधता आढळून येते. नेपाळमध्ये बोटे कुकूर (बोटे म्हणजे मोठे आणि कुकूर म्हणजे कुत्रा), चीनमध्ये झेन्गो, मंगोलियामध्ये बंखर तर युरोपमध्ये तिबेटियन मॅस्टीफ या नावाने हे श्वान ओळखले जातात. तिबेट परिसरात हे श्वान अधिक प्रमाणात आढळत असल्याने युरोपमध्ये या श्वानांना तिबेटियन मॅस्टीफ असे म्हणतात. युरोपीय भाषेत मॅस्टीफचा अर्थ मोठा असा असल्याने त्यांना तिबेटियन मॅस्टीफ असे म्हणतात. अनेक देशांतील उत्तर पूर्व भागात या श्वानांचे वास्तव्य आहे.
या श्वानांना ५८ हजार वर्षांचा इतिहास आहे. १८७२ मध्ये युरोपमधील एका लेखकाने या श्वानांविषयी माहिती देणारा एक लेख लिहिला. साधारणपणे १८८० मध्ये युरोपमध्ये या श्वानांची जोडी पाचवा किंग जॉर्जने नेली. तेव्हापासून जगभरात या श्वानांचा प्रसार झाला. २००८ मध्ये झालेल्या संशोधनानुसार युरोपातल्या काही श्वान प्रजातींमध्ये या तिबेटियन मॅस्टीफची जनुके आढळली, असे समजते.
स्वभावाने अत्यंत रागीट, रांगडा, उंच बंधा, व्यवस्थित अंगकाठी, मालकाची आज्ञा जवळजवळ न पाळणारा, स्वत:चा असा एक रुबाब असणारा व अंगावर सिंहासारखी आयाळ मिरवणाऱ्या या श्वानाला पाहताच धडकी नाही भरली तरच नवल. अतिथंड प्रदेशात राहत असल्यामुळे या श्वानांच्या अंगावर सिंहांसारख्याच आयाळी दिसून येतात. या श्वानांच्या शरीरयष्टीनुसार याचा आहार अगदी व्यवस्थित, भरगच्च व वेळेवर द्यावा लागतो. त्याच्या तंदुरुस्तीसाठी काही वेळा आहाराच्या बाबतीत काटेकोरपणे बाळगणे महत्त्वाचे ठरते. मोठमोठी कोठारे, बंगले इत्यादींच्या रक्षणासाठी तसेच तिबेटमध्ये आजही गुरांच्या, मेंढय़ांच्या कळपांचे वाघ, अस्वल, कोल्हा अशा बलवान प्राण्यांपासून वाचवण्यासाठी या श्वानांचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे हे धनगरांचे वाली ठरू शकतात. मात्र या श्वानांना घरी पाळणे धोकादायक ठरू शकते. नवीन लोकांसाठी किंवा पाहुण्यांसाठी हा श्वान म्हणजे कर्दनकाळच! या जातीचे दोन श्वान हे एका वाघाच्या ताकदीएवढे मानले जातात. दिवसा झोपून रात्री रक्षण करणाऱ्या या श्वानांना रोज चालण्यासाठी घेऊन गेल्यास त्यांच्या मानसिक स्थितीसाठी हा व्यायाम लाभदायक ठरतो. एरव्ही रागात असलेल्या या श्वानांस खुल्या वातावरणात नेल्यास ते शांत राहण्याची शक्यता असते. या श्वानांचे वजन साधारणपणे ४५ ते ५२ इतके असते तर उंची ३३ सें.मी. इतकी असते. त्यांना सांभाळणे म्हणजे एखादे शिवकार्य हाती घेतल्यासारखेच ठरते.
या श्वानांची किंमत हजारांत होऊच शकत नाही. त्यांच्या किमती लाखांच्या पुढेच असतात. श्वान या प्राण्याची ही काही सर्वसाधारण लक्षणे सांगितली जातात, त्यापेक्षा वेगळा, रुबाबदार आणि ताकदवान तिबेटियन मॅस्टिक आदर्श राखणदार म्हणून ओळखला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा