डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक ते पाचच्या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पादचारी पुलाच्या कामासाठी या पुलाने बाधित होत असलेले फलाट क्रमांंक एकवरील जुने प्रवासी आरक्षित तिकिटांचे केंंद्र फलाटाच्या कल्याण बाजुकडे स्थलांतरित करण्यात आले आहे. हे केंद्र उभारणीचे काम मागील दोन महिन्यांंपासून सुरू होते. हे केंद्र आता प्रवासी सेवेसाठी सज्ज करण्याचे काम अंतीम टप्प्यात आले आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. या गर्दीमुळे सरकते जिने, पायी जाण्याचे जिने प्रवाशांना अपुरे पडत आहेत. या जिन्यांवरील गर्दी पु्न्हा पादचारी पुलावर येते. त्यावेळी प्रवाशांंना चालणे मुश्किल होते. प्रवाशांची ही अडचण विचारात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने डोंबिवली रेल्वे स्थानकात पंडित दिन दयाळ चौक ते डोंबिवली पूर्व भागातील रामनगर दरम्यान फलाट क्रमांंक एक ते पाचच्या दरम्यान एक पादचारी पूल उभारणीचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू केले आहे.

हेही वाचा… अन्यथा राजन विचारे, विनायक राऊत पराभूत होण्याचे कारण नव्हते, नाना पटोलेंचा शिंदे सरकारवर आरोप

या पुलाच्या उभारणीत दिनदयाळ चौक भागातील जुने रेल्वे आरक्षण केंद्र बाधित होते. त्यामुळे पुलाचे काम सुरू झाल्यानंतर आरक्षित तिकिटे घेणाऱ्या प्रवाशांची गैरसोय नको म्हणून रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांंक एकवरच कल्याण बाजुने तात्पुरत्या स्वरुपात आरक्षण केंद्र उभारणीचे काम गेल्या दोन महिन्यापासून सुरू केले आहे. हे काम आता अंतीम टप्प्यात आले आहे. लवकरच हे आरक्षण केंद्र सुरू करण्यात येईल, असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा… कल्याणमधील तरुणीची लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील तरुणाकडून ६० लाखाची फसवणूक

नवीन जागेत आरक्षण केंद्र सुरू झाले की जुने आरक्षण केंद्र रेल्वे ठेकेदाराकडून पाडण्याचे काम सुरू केले जाणार आहे. नवीन जागेत आरक्षण केंद्र सुरू झाल्याने डोंबिवली पश्चिमेतून महात्मा फुले रस्त्याने येणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकात आता मुख्य प्रवेशव्दारातून यावे लागणार आहे. रिक्षा चालकांनाही या भागात रिक्षा उभी करून प्रवासी मिळणे शक्य होणार नसल्याने हा रस्ता आता वाहतुकीसाठी मुक्त राहणार आहे.