ठाणे : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने भाजपने ठाण्यात फलकबाजी केली होती. परंतु त्या फलकांवर १३२ ऐवजी १२८ वी जयंती असा चुकीचा उल्लेख केल्याने काही जणांनी आक्षेप घेत रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. आमदार निरंजन डावखरे हे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांकडून चूक झाल्याचे मान्य करत हे फलक काढण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजपवर हे फलक काढण्याची वेळ ओढवली.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिलला १३२ वी जयंती साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्ताने ठाण्यातील तीन हात नाका येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी फलक उभारला होते. ‘महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्ताने विनम्र अभिवादन’ असा येथे उल्लेख आहे. याच फलकावर आमदार निरंजन डावखरे आणि माजी खासदार संजीव नाईक यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. तसेच फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र होते.
हेही वाचा… कल्याण-डोंबिवलीत विजेच्या लपंडावाने रहिवासी हैराण
हेही वाचा… डोंबिवलीतील निळजे पाड्यातील उच्चशिक्षित घरफोड्याला अटक, ४७ तोळे सोने जप्त
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आहे. परंतु फलकावर १२८ वी जयंती हा चुकीचा उल्लेख केल्याने काहीजणांनी तीन हात नाका येथे येऊन रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. याची माहिती आमदार निरंजन डावखरे यांना मिळाल्यानंतर ते तीन हात नाका यथे आले. त्यांनी कार्यकर्त्यांकडून चूक झाल्याचे मान्य करत फलक काढून टाकण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजपला हे फलक काढण्याची वेळ ओढवली.