कल्याण – कल्याण जवळील मोहने जेतवननगर भागातील एका ४५ वर्षाच्या रिक्षा चालकाने सावकाराकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या केली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी रिक्षा चालकाच्या नातेवाईकांनी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अशी घटना काही दिवसापूर्वी आंबिवली अटाळी भागात घडली होती. त्यामुळे सर्व खासगी सावकारांच्या चौकशी करून त्यांच्या कर्जवसुली पध्दतीची माहिती आणि आढावा घेण्याचे आदेश खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे यांनी अधिनस्त पोलिसांना दिले आहेत.

विजय जीवन मोरे असे आत्महत्या केलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. ते कुटुंबीयांसह मोहने जेतवनगर भागात राहत होते. राजू जीवन मोरे यांनी याप्रकरणाची तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. पोलीस सुत्र आणि कुटुंबीयांकडून मिळालेली माहिती अशी, की रिक्षा चालक विजय मोरे यांनी एका सावकाराकडून २० ते ३० टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. घेतलेल्या कर्जावर मोठ्या प्रमाणावर व्याज आकारले जात असल्याने ही परतफेड करणे शक्य होत नसल्याने सावकाराकडून रक्कम भरण्यासाठी तगादा लावला होता. विविध प्रकाराने विजय यांना त्रास दिला जात होता.

हा त्रास असह्य झाल्याने सोमवारी आपल्या राहत्या घरातील छताला नायलाॅनची दोरी बांधून विजय मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. विजय यांना कुटुंबीयांनी तात्काळ पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी कुटुंबीयांंनी सावकाराविरुध्द कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या सावकारांविरुध्द चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी मोरे कुटुंबीयांना दिले आहे. सावकाराच्या त्रासाला कंटाळुन आपण आत्महत्या केली आहे. यात कुटुंबीयांना दोषी धरू नये. सावकारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विजय मोरे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केली आहे. दोन दिवसापूर्वीच कल्याणमधील एका खासगी सावकाराच्या समर्थकांनी आंबिवली भागातील एका व्यावसायिकाला आपल्या कार्यालयात आणून मारहाण केली होती. रिक्षा चालकांनी याप्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.